Agni-5 Successfully Test-Fired By India : भारताने आज इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणजेच आयआरबीएम अग्नि ५ ची यशस्वी चाचणी केली आहे. ही चाचणी ओडिशातील चांदीपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंजमधून करण्यात आली आणि सर्व निकषांवर ही चाचणी यशस्वी ठरली आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही चाचणी आज (२० ऑगस्ट २०२५) रोजी स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड अंतर्गत करण्यात आली. या क्षेपणास्त्राने सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक निकष पूर्ण केले आहेत. संरक्षण अधिकाऱ्यांच्या मते, ही चाचणी नियमित प्रक्रियेचा एक भाग आहे जेणेकरून सिस्टम तयार ठेवता येईल आणि गरज पडल्यास सिस्टम वेगात तैनात आणि सक्रिय करता येईल.

पाकिस्तान चिंतेत

भारताने केलेल्या अग्नी ५ च्या यशस्वी चाचणीमुळे पाकिस्तानमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पाकिस्तानस्थित थिंक टँक असलेल्या स्ट्रॅटेजिक व्हिजन इन्स्टिट्यूटने पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांना इशारा दिला आहे की भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम पाकिस्तानसाठी “गंभीयर धोका” आहे.

स्ट्रॅटेजिक व्हिजन इन्स्टिट्यूटने नमूद केले की, २०१६ मध्ये क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण प्रणाली मध्ये सामील झाल्यानंतर भारताच्या क्षेपणास्त्र विकासाला वेग आला आहे.

अग्नि ५ ची वैशिष्ट्ये

  • अग्नि ५ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे जे अण्वस्त्रे देखील वाहून नेऊ शकते. हे क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसित केले आहे.
  • अग्नि ५ ची मारा करण्याची क्षमता ५००० किमी आहे आणि डीआरडीओ त्याची मारा करण्याची क्षमता ७५०० किमी पर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
  • गेल्या वर्षी, डीआरडीओने अग्नि ५ ची चाचणी केल्यानंतर हे क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम झाले होते.
  • हे क्षेपणास्त्र आता शत्रूचे भूमिगत बंकर नष्ट करण्यासाठी बंकर नष्ट करणारे क्षेपणास्त्र म्हणून विकसित केले जात आहे. अग्नि ५ ची पहिली चाचणी १९ एप्रिल २०१२ रोजी घेण्यात आली होती.

अग्नि मालिकेत अनेक क्षेपणास्त्रांचा समावेश

भारताने अग्नि मालिकेतील अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत जी वेगवेगळ्या लक्ष्यांसाठी आणि उद्देशांसाठी वापरली जाऊ शकतात. अग्नि १ ची श्रेणी ७०० किमी आहे. तर अग्नि २ ची श्रेणी २००० किमी आहे. अग्नि ३ आणि अग्नि ४ ची श्रेणी २५०० ते ३५०० किमी दरम्यान आहे.