Suicide horror : प्रवीण मित्तल या ४१ वर्षीय व्यावसायिकाने विविध व्यवसाय करुन आपला आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर तो कर्जबाजारी झाला. त्यामुळे प्रवीणसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा पर्याय निवडला. हरियाणातील पंचकुला या ठिकाणी एका कारमध्ये एकाच कुटुंबातल्या सात जणांचे मृतदेह आढळून आले.
प्रवीण मित्तल (वय ४१), प्रवीणचे वडील देशराज मित्तल (वय-७०), प्रवीणची आई बिमला (वय ६६), प्रवीणची पत्नी रिना (वय-३८), ध्रुविता आणि दिलिशा या ११ वर्षांच्या दोन जुळ्या मुली आणि मुलगा हार्दिक (वय १४) या सात जणांनी विष पिऊन आयुष्य संपवलं. हरियाणातील पंचकुला या ठिकाणी सेक्टर २७ मध्ये ही घटना मंगळवारी उघडकीस आली.
सेक्टर २७ मधला रहिवासी हर्ष राणाने काय सांगितलं?
पंचकुला येथील सेक्टर २७ मध्ये राहणाऱ्या हर्ष राणाने सर्वात आधी ही कार आणि त्यातल्या लोकांना पाहिलं होतं. त्याने प्रवीण मित्तलशी संवादही साधला होता. कारण हर्षच्या सांगण्यानुसार प्रवीण तेव्हा जिवंत होता. हर्षने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो घराबाहेर फिरत होता, त्यावेळी त्याने ती कार पाहिली ज्यात मित्तल कुटुंब होतं. प्रवीण मित्तल हा तेव्हा अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला रुग्णालयात नेल्यानंतर तिथे त्याचा मृत्यू झाला. बाकी सहा जणांचा मृत्यू कारमध्येच झाला. मित्तल कुटुंबावर मोठं कर्ज होतं त्यामुळे त्यांनी ही सामूहिक आत्महत्येचा मार्ग निवडला.
प्रवीण यांनी विष प्यायल्याचं सांगितलं!
दरम्यान, प्रवीण यांनी विष प्यायल्याच सांगितलं, असं हर्ष म्हणाला. “प्रवीण मित्तल हे अर्धवट शुद्धीत होते. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावर मला संशय आला. ते अडखळत होते. मी त्यांना थोडं पाणी पाजलं. त्यांनी मला सांगितलं की त्यांनी विष प्यायलं आहे. कारमधल्या सर्व कुटुंबीयांनीही विष प्यायल्याचं ते म्हणाले. मी लगेच पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलीस तिथे आले आणि त्यांनी प्रवीण मित्तल यांना रुग्णालयात नेलं. त्यानंतर कारमधल्या सगळ्यांनाही नेलं”, असं हर्ष म्हणाला. या सर्वांना रुग्णालयाल मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांना या कारमधून एक सुसाईड नोट सापडल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. “मी कर्जबाजारी झालो आहे. या सगळ्यासाठी मीच जबाबदार आहे. माझ्या सासऱ्यांना त्रास दिला जाऊ नये. आमच्यावर अंत्यसंस्कार माझ्या चुलत भावाला करू दिले जावेत”, असं या नोटमध्ये प्रवीण मित्तल यांनी लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत प्रवीण मित्तल यांच्या नातेवाईकाने दावा केला की, मित्तल यांच्यावर २० कोटींचे कर्ज होते. याप्रकरणी त्यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. या तणावाखाली आल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा.
मित्तल यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी काय सांगितलं?
प्रवीण मित्तल आणि इतर सर्व सदस्यांचा आत्महत्येमुळे मृत्यू झाला. त्यानंतर प्रवीणच्या इतर नातेवाईकांनी सांगितलं साधारण २००० किंवा २००१ च्या दरम्यान प्रवीण आणि त्याचं कुटुंब पंचकुला या ठिकाणी राहण्यास आलं होतं. त्यावेळी प्रवीणचं लग्न रीनाशी झालं. प्रवीणचे मावस आणि चुलत भाऊ या दोघांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की प्रवीण अनेक व्यवसाय करत होता. पण २००८ मध्ये त्याला खूप मोठा तोटा झाला. भंगारवर प्रक्रिया करुन तो फॅक्ट्री तो चालवत होता पण त्याला खूप नुकसान झालं. त्याने या कर्जातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण त्याचं कर्ज वाढलं. बँकेने त्याच्या फॅक्ट्रीवर जप्ती आणली होती. तसंच त्याच्या इतर मालमत्तांवरही जप्ती आणली होती. त्यावेळीच त्याला प्रवीणला साधारण १२ ते १५ कोटींचं कर्ज झालं आहे. त्यानंत जवळपास पुढची पाच ते सहा वर्षे प्रवीण आम्हा सगळ्यांपासून वेगळा झाला. त्याने कुणाशीही नातेसंबंध ठेवले नाहीत. त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार २०१४ मध्ये आम्हाला असं कळलं की प्रवीण आणि त्याचं कुटुंब देहरादूनला गेल्याचं समजलं. अंकित मित्तलने (प्रवीणचा चुलत भाऊ) ही माहिती दिली.
अंकितने इंडियन एक्स्प्रेसला काय सांगितलं?
अंकितने यानंतर इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की प्रवीण काही कौटुंबिक कार्यक्रमांना आम्हाला भेटत असे. तसंच मी त्याच्या देहरादून येथील घरीही गेलो होतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याला व्यवसयांमध्ये प्रचंड आर्थिक नुकसानच झालं होतं. देहरादूनला ट्रॅव्हल्स आणि टूरचा व्यवसाय तो करत होता पण तो चालत नव्हता. प्रवीणने जी सुसाईड नोट लिहिली त्यात त्याने लिहिलं आहे की आमचं जे काही कर्ज आहे त्यासाठी माझे सासरे राकेश गुप्ता यांना कुठलाही त्रास देऊ नये. काही महिन्यांपूर्वी हे कुटुंब पंचकुला या ठिकाणी शिफ्ट झालं होतं.
प्रवीण कर्जबाजारी झाल्याने सासरीही राहू लागला होता
प्रवीणच्या चुलत भावांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण त्याच्या सासऱ्यांच्या घरी राहू लागला होता. प्रवीणचे सासरे तळ मजल्यावर राहात होते. तर पहिल्या मजल्यावर प्रवीण आणि त्याचं कुटुंब राहात होते. प्रवीणच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार पाच दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं. त्यावेळी तो मला म्हणाला की आता सगळं व्यवस्थित चाललं आहे तसंच आम्ही आता साकेत्री जवळच्या मनसा देवी इमारातीत शिफ्ट झालो आहे. तिथे आम्ही भाडे तत्त्वावर राहतो.
नेमकं काय घडलं प्रवीण मित्तल यांच्या आयुष्यात?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण मित्तल व त्यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक संकट व मानसिक अस्थिरता यामुळे सामुहिक आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. त्यांच्या कुटुंबीयांची व इतर आप्तस्वकीयांची चौकशी करून इतर माहिती पोलीस गोळा करत आहेत.
मनिष चौधरींनी काय सांगितलं?
प्रवीण ज्या घरात राहात होता त्याचे मालक मनिष चौधरी म्हणाले की साधारण महिन्याभरापूर्वी तो इथे राहिला आला होता. ८ हजार रुपये भाडे तत्त्वावर तो राहण्यास आला होता. सोमवारी प्रवीणने मला सांगितलं की मी कुटुंबासह बाहेर चाललो आहे. ज्यानंतर मंगळवारी सकाळी या सगळ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी आम्ही पाहिली आणि आम्हाला प्रचंड धक्का बसला असंही चौधरी यांनी सांगितलं.