scorecardresearch

सुनंदा पुष्कर यांच्यावर तोंडावाटे किंवा इंजेक्शनद्वारे विषप्रयोग

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूसंदर्भात शवविच्छेदन अहवालाच्या आधारे दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूसंदर्भात शवविच्छेदन अहवालाच्या आधारे दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. २९ डिसेंबर रोजी सादर करण्यात आलेल्या या अहवालात मृत्युपूर्वी सुनंदा पुष्कर यांना कोणताही आजार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत्यूपूर्वी सुनंदा यांची प्रकृती उत्तम असल्यामुळे त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची शक्यता अहवालात पूर्णपणे फेटाळण्यात आली आहे.
या अहवालानुसार तोंडावाटे किंवा इंजेक्शनने सुनंदा पुष्कर यांच्या शरीरात विषाचा शिरकाव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. यापैकी तोंडावाटे त्यांच्या शरीरात विष गेल्याची दाट शक्यता असली तरी, इंजेक्शनने विषाचा शिरकाव झाल्याची शक्यताही पूर्णपणे नाकारण्यात आलेली नाही. सर्व शक्यतांचा तपास केल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. यापूर्वी एम्स रूग्णालयाकडून सादर करण्यात आलेल्या सुनंदा यांच्या शवविच्छेदन अहवालातही याच बाबींचा उल्लेख होता. त्यानंतर पोलिस आणि एम्स रूग्णालयाच्या संबंधित प्रतिनिधींनी एकमेकांशी चर्चाही केली होती. यासंदर्भात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी ‘एम्स’कडून पोलिसांना अनेक गोष्टींविषयी स्पष्टीकरणही देण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी सुनंदा पुष्कर यांचा नोकर नारायण सिंह याचीही चौकशी केली. यावेळी काही बाबी पोलिसांसमोर आल्या आहेत. नोकराने दिलेल्या माहितीनुसार मृत्यूच्या दोन दिवस आधी सुनील नावाच्या एका व्यक्तीने सुनंदा पुष्कर यांची भेट घेतली होती. त्यामुळे पोलिस याचाही तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2015 at 12:55 IST

संबंधित बातम्या