सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरणात सोमवारी दिल्ली पोलिसांनी कोर्टात तीन हजार पानी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात दिल्ली पोलिसांनी सुनंदा यांचे पती आणि खासदार शशी थरुर यांच्या नावाचा आरोपीमध्ये समावेश केला आहे. चार वर्षांपूर्वी दिल्लीतील हॉटेल लीलामध्ये रुम नंबर ३४५ मध्ये सुनंदा मृतावस्थेत आढळल्या होत्या. ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. शशी थरुर यांच्यावर पत्नी सुनंदाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात हत्येच्या कलम ३०२ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. १७ जानेवारी २०१४ रोजी दक्षिण दिल्लीतील हॉटेल लीलीमधील रुम नंबर ३४५ मध्ये सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळल्या होत्या. घटनेच्याच रात्री तपासासाठी या रुमला टाळे ठोकण्यात आले होते. १ जानेवारी २०१५ रोजी अज्ञात व्यक्तिविरोधात हत्येच्या कलमाखाली एफआयआर नोंदवण्यात आला. पतियाळा हाऊस कोर्टात यावर २४ मे रोजी सुनावणी होणार आहे. शशी थरुर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात राज्यमंत्री होते. केरळची राजधानी तिरुअनंतपूरम येथून ते खासदार आहेत. सुरुवातीपासून सुनंदा यांच्या मृत्यूबद्दल संशय होता. एम्स रुग्णालयाने अनैसर्गिक मृत्यू असल्याचे स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे माजी पोलीस उपायुक्त बी.एस. जयस्वाल यांनी आपल्या अहवालात सुनंदा पुष्कर यांची हत्या करण्यात आल्याचे म्हटले होते. आपल्या अहवालात त्यांनी एम्स रूग्णालयातील शवविच्छेदन अहवालाचा दाखला दिला होता. सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर दाताने चावल्य्याच्या खुणा, सिरींजच्या खुणा आणि झटापट झाल्याने जखमा झाल्याच्या खुणा आढळल्या होत्या. या खुणांमुळे त्यांची हत्याच झाली असावी असे स्पष्ट होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. ‘