काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणात त्यांचे पुत्र शिव मेनन यांची विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी चौकशी केली. पोलिसांनी समन्स पाठवून बोलावलेले शिव मेनन हे दुपारी वसंतकुंज येथील एसआयटीच्या कार्यालयात पोहचले. ते तपासात सहकार्य करत असून आमची प्रश्नोत्तरे अद्याप सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात शशी थरूर, त्यांचे कार्यालयीन कर्मचारी व जवळचे मित्र, समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंग, वरिष्ठ पत्रकार नलिनी सिंग यांच्यासह किमान १५ जणांची एसआयटीने आतापर्यंत चौकशी केली आहे. ५२ वर्षांच्या पुष्कर या १७ जानेवारी २०१४ रोजी दक्षिण दिल्लीतील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. पोलिसांनी गेल्या महिन्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

न्यूयॉर्कमधील अपघातात १ भारतीय ठार
न्यूयॉर्क : न्यूयॉर्कच्या उपनगरातील एका भीषण अपघातामध्ये ठार झालेल्या सहाजणांमध्ये भारतीय वंशाच्या एकाचा समावेश आहे.
मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजता मॅनहॅटनमधील ग्रँड सेंट्रल स्थानकावरून निघालेल्या मेट्रो- नॉर्थ या रेल्वेगाडीने न्यूयॉर्कच्या वल्हाला या उपनगरात रुळांवरील एका मोटारीला जोरदार धडक दिली. या अपघातात सहाजण ठार, तर १५ जखमी झाले. मृतांमध्ये भारतात जन्मलेल्या ४१ वर्षे वयाच्या आदित्य तोमर यांचा समावेश आहे. मॅनहॅटन येथे जे पी मॉर्गन या कंपनीत काम करणारे तोमर कनेक्टिकटमधील डॅनबरी येथे राहात होते.

दिल्लीत तृणमूलचा ‘आप’ला पाठिंबा
कोलकाता : येत्या ७ फेब्रुवारीला होत असलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. ‘देशाच्या व्यापक हितासाठी आणि राजधानीच्या विकासासाठी’ आपण हा पाठिंबा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीची निवडणूक ७ फेब्रुवारीला होत आहे. देशाची व्यापक गरज आणि दिल्लीचा विकास यासाठी तुम्ही सर्वानी कृपया ‘आप’ला मत द्यावे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममताजींनी ‘ट्विटर’वर म्हटले आहे.

खासदार बोस यांचा राजकारण संन्यास
कोलकाता : राजकारण हा प्रांत नाही असे सांगत तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य श्रींजॉय बोस यांनी खासदारकीचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे शारदा चिट फंड घोटाळाप्रकरणी बोस हे ७५ दिवस तुरुंगात होते. बुधवारीच त्यांची सशर्त सुटका करण्यात आली होती. बोस यांच्यावर प्रचंड दबाव आल्यानेच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील मुख्य प्रतोद डेरेक ओ’ब्रायन यांनी केला आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी हा दबाव आणल्याची टीका ब्रायन यांनी केली. तुरुंगात असताना राजकारणात सहभाग घेण्याइतका मी मुरब्बी नाही, हे लक्षात आल्याचे बोस यांनी स्पष्ट केले. तृणमूल काँग्रेसचे मुखपत्र असलेले जागा बांगलाचे ते संपादक होते. आई व पत्नीकडून प्रचंड दबाव आल्याने तृणमूल काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोस यांनी सांगितले.

‘डेरा सच्चा सौदा’चा भाजपला पाठिंबा
चंदीगड : गुरमीत राम रहीम सिंग यांच्या नेतृत्वाखालील डेरा सच्चा सौदा या पंथाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. ‘डेरा सच्चा’ने दिल्लीच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे या पंथाच्या राजकीय व्यवहार विभागाचे अध्यक्ष रामसिंग यांनी पीटीआयला सांगितले. डेराने दिल्लीत आपले २० लाख अनुयायी असून त्यापैकी १२ लाख मतदार असल्याचा दावा केला.