भारतातील लघु उद्योग आणि मध्यम उद्योगांना चालना मिळावी म्हणून गुगलचे मुख्याधिकारी सुंदर पिचाई यांनी डिजीटल अनलॉक आणि माय बिजनेस वेबसाइट या दोन योजनांची घोषणा केली आहे. भारतामधील लघु उद्योजकांमध्ये भरपूर क्षमता आहे. त्यांनी जर तंत्रज्ञानाचे साहाय्य घेतले तर त्यांची आर्थिक भरभराट होऊ शकते. त्याकरिता गुगलने लघु उद्योजकांसाठी डिजीटल अनलॉक आणि माय वेबसाइट या दोन योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

डिजीटल अनलॉक अंतर्गत इंटरनेटचा वापर करून आपला व्यापार जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहचावा यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. देशातील ४० शहरांमध्ये या कार्यशाळा होणार असल्याची माहिती सुंदर पिचाई यांनी लघु उद्योगांसाठी आयोजित मेळाव्यामध्ये दिली.

दुसरी घोषणा त्यांनी ‘माय बिजनेस वेबसाइट’ या कार्यक्रमाची केली आहे. प्रत्येक छोट्या व्यापाऱ्याला देखील गुगलद्वारे आपली स्वतंत्र वेबसाइट तयार करता येऊ शकेल असे पिचाईंनी म्हटले. वेबसाइट बनवणे आणि ती सांभाळणे या दोन्ही गोष्टी अतिशय क्लिष्ट आहेत तेव्हा व्यापाऱ्यांना हाताळता येईल अशी वेबसाइट गुगलच्या या कार्यक्रमाद्वारे मिळू शकेल. ही वेबसाईट मोबाईलद्वारे सुद्धा चालवली जाऊ शकेल असे सुंदर पिचाईंनी म्हटले. मागील वर्षी जेव्हा पिचाई भारतामध्ये आले होते. तेव्हा त्यांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी इंटरनेट ही संकल्पना मांडली होती. तसेच देशातील १०० रेल्वेस्थानकावर त्यांनी हायस्पीड वायफाय उपलब्ध करुन दिले होते. यावेळी त्यांनी आपले लक्ष लघु उद्योगांकडे दिले आहे.