नवी दिल्ली : विरोधकांनी त्यांच्या पक्षसंघटनेत विविध जातीच्या लोकांना किती प्रतिनिधित्व दिले हे आधी सांगावे, असा सवाल भाजपने विरोधकांच्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीवर केला आहे. 

    सर्वोच्च न्यायालयात मोदी सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करून जातीनिहाय जनगणना करणार नाही असे म्हटले आहे. त्यानंतर विरोधकांनी या निर्णयावर टीका केली होती. भाजपने म्हटले आहे, की जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर आमची भूमिका ठाम आहे.  ती मित्र पक्षांनाही पटेलच असे नाही. भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सांगितले,की  समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, बहुजन समाज पक्ष यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. त्या पक्षांचे नेते स्वत:ला वंचित व गरीब समाजाचे प्रतिनिधी समजतात पण प्रत्यक्षात त्यांनी घराणेशाही चालवली आहे.

जातीनिहाय जनगणनेवर भूमिका विचारली असता त्यांनी सांगितले,की आमची भूमिका ही तांत्रिक मुद्द्यावर आधारित आहे.  मुलायम सिंह यादव यांनी स्वत:ला धरतीपुत्र म्हणवून घेतले तरी त्यांनी राजकारणात मुलाला पुढे आणले. मायावती यांनी त्यांच्या भावाला राजकारणात आणले.  राजदने घराणेशाहीचे राज्य चालवले व भ्रष्टाचार केला.  पंतप्रधान मोदी यांची भूमिका सबका साथ सबका विकास अशीच आहे.

सरकारने थेट लाभ हस्तांतरासारख्या अनेक योजना राबवल्या आहेत, त्याचा गरिबांना फायदा झाला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात आम्ही सगळ्यांना प्रतिनिधित्व दिलं आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी मित्र पक्ष असूनही जातीनिहाय जनगणनेची मागणी केल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले,की वेगवेगळ्या पक्षांना वेगवेगळी भूमिका घेण्याचे स्वातंत्र्य आहे.