नवी दिल्ली : विवाहानंतर पती किंवा पत्नी जोडीदारापासून स्वतंत्र राहायचे आहे असे म्हणूच शकत नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका सुनावणीवेळी केली, तसेच जर एखाद्याला स्वतंत्र राहायचे असेल तर त्याने लग्नच करू नये, असा इशारादेखील न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने दिला. सिंगापूरमध्ये राहणारा पती आणि हैदराबादमध्ये राहणाऱ्या त्याच्या पत्नीमधील वादात न्यायालयाने मुलांचे भविष्य महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.

विभक्त राहत असलेल्या दाम्पत्याच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. या दाम्पत्याला दोन अल्पवयीन मुलेदेखील आहेत. जोपर्यंत आमचे वैवाहिक संबंध आहेत तोपर्यंत जोडीदारापासून स्वतंत्र राहायचे आहे, असे कोणताही पती किंवा पत्नी म्हणूच शकत नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. विवाह म्हणजे दोन हृदयांचे, व्यक्तींचे एकत्र येणे. तुम्ही स्वतंत्र कसे राहू शकता? असा प्रश्नही खंडपीठाने याचिकाकर्त्यांना केला. दरम्यान, दोन्ही पक्षकारांना त्यांचे मतभेद सोडवण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. या महिलेचा पती सध्या भारतात असून १ सप्टेंबर रोजी सिंगापूरला परत जाणार असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.

जर हे दाम्पत्य एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल, कारण त्यांची मुले खूप लहान आहेत. त्यांनी त्यांचे घर उद्ध्वस्त झालेले पाहू नये. घर उद्ध्वस्त झाले तर त्यांचा काय दोष? प्रत्येक पती-पत्नीमध्ये वाद असतातच. – सर्वोच्च न्यायालय

पती सिंगापूरमध्ये, पत्नी हैदराबादेत

सुनावणीवेळी संबंधित महिला दूरदृश प्रणालीद्वारे उपस्थित होती. टाळी एका हाताने वाजत नाही, असे तिने म्हणताच, आम्ही दोघांनाही म्हणत आहोत केवळ तुम्हाला नाही, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले. महिलेने असा दावा केला तिचा पती सिंगापूरमध्ये कार्यरत असून सध्या तो भारतात आहे. तथापि, तो प्रकरण मिटवण्यास तयार नाही आणि त्याला फक्त भेटीचे अधिकार आणि मुलांचा ताबा हवा आहे. हैदराबादमध्ये राहणाऱ्या या महिलेला सिंगापूरला मुलांसह जाण्यात काय अडचण आहे असा प्रश्नही खंडपीठाने केला. आई म्हणून उदरनिर्वाहासाठी नोकरीची गरज अधोरेखित करतानाच विभक्त पतीकडून कोणतीही पोटगी मिळाली नसल्याचे तिने न्यायालयाला सांगितले.

खंडपीठाचा भावनिक संदेश

सुनावणीदरम्यान, पत्नीने कोणावरही अवलंबून राहायचे नाही, असे सांगितले. विवाहानंतर भावनिकदृष्ट्या पतीवर अवलंबून असता कदाचित आर्थिक दृष्टीने नसेलही, तथापि अवलंबून राहू इच्छित नसाल तर विवाहच कशाला केला? पत्नी पतीवर भावनिकदृष्ट्या अवलंबून असतेच. मी जुन्या विचारांची असू शकते, परंतु कोणतीही पत्नी मी माझ्या पतीवर अवलंबून राहू इच्छित नाही, असे म्हणूच शकत नाही, असे न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या. दरम्यान, महिलेने या मुद्द्यावर विचार करण्यासाठी काही वेळ मागितला.

१६ सप्टेंबर रोजी सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या इतर आदेशांना अडथळा न आणता पत्नी आणि मुलांच्या पालनपोषणासाठी ५ लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले, तसेच प्रकरणाची पुढील सुनावणी १६ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.