scorecardresearch

Thackeray vs Shinde : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी Live पाहता येणार; तुमच्या मोबाईलवर दिसणार सत्तासंघर्षाचा युक्तीवाद

महाराष्ट्रातील शिंदे विरुद्ध ठाकरे हा सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यांवरील सुनावणी लाइव्ह पाहता येणार.

Thackeray vs Shinde : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी Live पाहता येणार; तुमच्या मोबाईलवर दिसणार सत्तासंघर्षाचा युक्तीवाद
आजपासून सुरु होणार ही सेवा

Supreme Court constitutional bench hearing to be live streamed: सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठापुढे होणाऱ्या सुनावण्याचं थेट प्रक्षेपण आजपासून म्हणजेच २७ सप्टेंबरपासून केलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात एका महिन्यापूर्वी नोटीस जारी करुन न्यायालयाच्या कामकाजासंदर्भातील खंडपीठाला याबद्दलचे निर्देश दिले होते. त्यानुसार आजपासून घटनापीठापुढील सुनावणीचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिंदे विरुद्ध ठाकरे हा सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यांवरील सुनावणीपासून या थेट प्रक्षेपणाला सुरुवात होणार आहे.

नक्की वाचा >> सर्वोच्च न्यायालयात या तीन गोष्टी निश्चित कराव्या लागतील, …तर शिंदे अपात्र ठरतील; कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांनी मांडली कायदेशीर बाजू

सर्वोच्च न्यायालयातील हे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय माहिती केंद्र म्हणजेच नॅशनल इनफॉर्मेटीक्स सेंटरच्या (एनआयसीच्या) माध्यमातून वेबकास्ट केलं जाणार आहे. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच वेबकास्ट डॉट जीओव्ही डॉट इन (webcast.gov.in) वर दिसणार आहे.

सरन्यायाधीश उदय लळीत यांनी लवकरच सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणी या न्यायालयाच्या स्वत:च्या प्लॅटफॉर्मवरुन थेट प्रक्षेपित केल्या जातील अशी माहिती दिली. युट्यूबवरुन थेट प्रक्षेपण करण्याऐवजी न्यायालय स्वत:च्या प्लॅटफॉर्मवरुन ही सेवा उपलब्ध करुन देईल, असा विश्वास सरन्यायाधिशांनी व्यक्त केला. सध्या सर्वोच्च न्यायालयाकडून युट्यूबवरुन थेट प्रक्षेपण केलं जातं आणि नंतर ते स्वत:च्या सर्व्हरवरुन दाखवलं जातं, अशी माहिती सूत्रांनी दिली. लोकांना त्यांच्या लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि कंप्युटरवर कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: “…तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करुन…”; SC मधील सुनावणीआधीच राष्ट्रवादीने व्यक्त केली शक्यता

२६ ऑगस्ट रोजी तत्कालीन सरन्यायाधीश एन. व्ही रमण्णा यांनी थेट प्रक्षेपण करण्यासंदर्भातील निर्देश दिले होते. विशेष म्हणजे न्या. रमण्णा यांनी पदावर असतानाच्या शेवटच्या दिवशी ही सूचना केली. या सूचनेनुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये यंत्रणा उभारण्यात आली असून आजपासून या थेट प्रक्षेपणाला सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्या नोटिशींना आव्हान दिल्याच्या प्रकरणाची सुनावणी आज घटनापीठासमोर होणार आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या राज्यातील सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड यासह काही मुद्द्यांवरुन शिवसेना नेते सुभाष देसाई, प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकेच्या माध्यमातून आव्हान दिले असून त्यावरही आज सुनावणी होणार आहे. विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी आणि प्रभू यांच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्तीस शिंदे आणि त्यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आव्हान दिले आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार असून त्याचं थेट प्रक्षेपणही केलं जाणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या