नवी दिल्ली : ‘तुम्ही कुठे आहात हे आधी जाहीर करा,’ असे सर्वोच्च न्यायालयाने स्वत:साठी संरक्षक आदेशांची मागणी करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना गुरुवारी सांगितले. ‘तुम्ही कुठे आहात हे आम्हाला कळल्याशिवाय कुठलेही संरक्षण दिले जाणार नाही अथवा सुनावणी केली जाणार नाही’, असे न्यायालय त्यांना उद्देशून म्हणाले.

सिंह यांचा ठावठिकाणा सांगावा असे निर्देश त्यांच्या वकिलांना देऊन न्यायालयाने हे प्रकरण २२ नोव्हेंबरला सुनावणीसाठी ठेवले.

संरक्षणाची मागणी करणारी याचिका मुखत्यारपत्राद्वारे (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) दाखल करण्यात आली आहे, यावर न्या. एस.के. कौल व न्या. एम.एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने हरकत घेतली.

‘तुम्ही संरक्षक आदेशाची मागणी करत आहात, पण तुम्ही कुठे आहात हे कुणालाही ठाऊक नाही. कदाचित तुम्ही विदेशात बसला असाल आणि वकीलपत्राद्वारे कायदेशीर आधार घेत असाल. असे असेल आणि न्यायालायने तुम्हाला अनुकूल निर्णय दिल्यास तुम्ही भारतात याल. तुमच्या मनात काय आहे, हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही कुठे आहात हे आम्हाला कळेपर्यंत कुठलेही संरक्षण मिळणार नाही किंवा सुनावणी होणार नाही’, असे न्यायालय म्हणाले.

परमबीर सिंह यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या खंडणीच्या एका प्रकरणात मुंबईतील न्यायदंडाधिकाऱ्यांनी बुधवारी त्यांच्यासह इतर काही पोलीस अधिकाऱ्यांना फरार गुन्हेगार घोषित केले होते. यावर्षीच्या मे महिन्यात सिंह हे कार्यालयात आले होते व त्यानंतर ते सुट्टीवर गेले. त्यांचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे राज्य पोलिसांनी गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले होते.

सर्वोच्च न्यायालयाचे सवाल

‘तुम्ही या देशात आहात की बाहेर आहात? की कुठल्या राज्यात आहात? तुम्ही आहात कुठे? बाकीच्या गोष्टी आम्ही नंतर पाहू. आधी तुमचा ठावठिकाणा आम्हाला कळू द्या’, असे खंडपीठाने सांगितले.