नवी दिल्ली : शिवसेना हे पक्षनाव व धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह कोणाला बहाल केले जाणार यावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. या संदर्भातील हस्तक्षेप याचिकेवर सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने आता मूळ याचिकेवर सुनावणी घेऊन निकाल देण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले.
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असून या निवडणुकीपूर्वी पक्षनाव व निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी केली जावी, अशी हस्तक्षेप याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह गोठवले जावे, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे. मात्र सोमवारी न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने या मुद्द्यावर सुनावणी न घेता मूळ आव्हान याचिकेवरच सुनावणी घेतली जाईल, असे स्पष्ट केले.
हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे, आता दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल करणे बंद केले पाहिजे. मूळ आव्हान याचिकेवर सुनावणी घेऊन ऑगस्टमध्ये हे प्रकरण निकाली काढले जाईल. त्यासाठी ऑगस्टमध्ये सुनावणीसाठी तारीख निश्चित केली जाईल, असे न्या. सूर्यकांत यांनी सोमवारी सुनावणीवेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिबल यांना सांगितले. ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष ठाकरे गटाचा की, शिंदे गटाचा हे स्पष्ट होऊ शकेल.
ठाकरे गटाची मागणी अमान्य
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात दिलेल्या हंगामी आदेशाप्रमाणे शिवसेनेच्या निवडणूक चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश द्यावा असा विनंती अर्ज सोमवारी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षनाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला बहाल करण्यात आल्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला अटी-शर्तींवर निवडणूक चिन्हाचा वापर करण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पक्षनाव व चिन्ह वापरले जात असल्याची जाहिरात देण्याची अट अजित पवार गटाला घालण्यात आली. अशा स्वरूपाची अट शिवसेनेच्या शिंदे गटालाही लागू करावी, अशी ठाकरे गटाची मागणी आहे. न्या. सूर्य कांत यांच्या खंडपीठाने या मुद्द्यावर आदेश देण्यास नकार देत थेट मूळ पक्षनाव व निवडणूक चिन्हाचे प्रकरणच निकाली करण्यात येईल असे स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालय आमची शेवटची आशा : उद्धव ठाकरे
● शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह यावर सर्वोच्च न्यायालय ऑगस्टमध्ये निकाल देणार असेल, तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे. आणि आमची शेवटची एक आशा आता सर्वोच्च न्यायालयच आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर ऑगस्टमध्ये सुनावणी घेण्याचा निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
● सर्वोच्च न्यायालयात चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल. कारण आमचे जे चिन्ह चोरले गेले आहे ते चिन्ह देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, परंतु पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार नाही. कोणाचे नाव उचलून दुसऱ्याला द्यायचे, हा अधिकार निवडणूक आयोगाला नक्कीच नाही. त्यांना तो अधिकार असूच शकत नाही आणि आम्ही तो मान्यही करत नाही. निवडणूक चिन्हाबाबत म्हणाल तर ठीक आहे आणि त्याबाबतचे प्रकरणही न्यायालयात आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
● स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाष्य करताना ‘इंडिया’ आघाडीची बैठक झाली पाहिजे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ‘इंडिया’ आघाडीची बैठक झालेली नाही, मला वाटते लवकरात लवकर बैठक झाली पाहिजे. बिहारमध्ये निवडणुका आहेत, इतरही राज्यांत निवडणुका आहेत, महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे बैठक तर झालीच पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.