नवी दिल्ली : दिल्लीमध्ये २०२१ मध्ये एका धार्मिक कार्यक्रमात उपस्थितांनी द्वेषपूर्ण भाषणे केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी तपास प्रगतिपथावर आहे असे दिल्ली पोलिसांनी सांगितल्यावर न्यायालयाने त्याची नोंद घेतली. सरन्यायाधीश धनजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सोमवारी सुनावणी झाली.
या प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल असे दिल्ली पोलिसांच्या वतीने साहाय्यक महान्यायवादी के. एम. नटराज यांनी न्यायालयाला सांगितले. आरोपींच्या आवाजाच्या नमुन्यावर न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल अपेक्षित आहे अशी माहिती त्यांनी दिली. या प्रकरणी पुढील सुनावणी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे.
दिल्लीमध्ये हिंदू युवा वाहिनी या संघटनेने १९ डिसेंबर २०२१ रोजी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात धार्मिक अल्पसंख्याकांविरोधात द्वेषपूर्ण भाषणे करण्यात आल्याचा आरोप आहे. सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात द्वेषपूर्ण भाषणे थांबवण्यासाठी पोलिसांनी कोणतीही ठोस पावले उचलली नव्हती असा आरोप याचिकाकर्त्यांचे वकील शादान फरासत यांनी केला.
सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत कोणती पावले उचलली आहेत त्याची माहिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या प्रकरणी एफआयआर दाखल करायला उशीर का झाला असा प्रश्न मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना विचारला होता. त्यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्म संसदे’मध्येही द्वेषपूर्ण भाषणे करण्यात आल्याचा आरोप आहे. या दोन प्रकरणी तुषार गांधी यांनी याचिका केल्या होत्या.