Supreme Court ordered all stray dogs in Delhi-NCR to be moved to shelters : सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांबद्दल मोठा निर्णय दिला आहे. या भागातील सर्व भटक्या कुत्र्यांना ८ आठवड्यांच्या आत पकडा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी उभारलेल्या निवारा केंद्रांमध्ये ठेवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली आणि परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण आदेशात नगरपालिका आणि इतर यंत्रणांना निर्धारित वेळेत पुरेशी निवाऱ्याची व्यवस्था उभारण्यासाठी समन्वयाने काम करावे आणि सार्वजनिक ठिकाणांहून भटकी कुत्री हटवली जातील याची खात्री करा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
पुन्हा रस्त्यांवर सोडू नका
एकदा शेल्टरमध्ये हलवल्यानंतर कोणत्याही भटक्या कुत्र्याला पुन्हा रस्त्यावर सोडले जाऊ नये असेही न्यायालयाने म्हटले आहे. भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्येच ठेवले जावे आणि त्यांना रस्ते, कॉलन्या किंवा सार्वजनिक ठिकाणी सोडू नये असेही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. यावेळी दिल्ली सरकार, एमसीडी आणि एनडीएमसीला सर्व परिसरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यास सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इतकेच नाही तर जर कोणी व्यक्ती किंवा संस्था या भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या मधे येथ असेल तर अशांविरोधात कारवाई केली जाणार आहे. लहान किंवा तरुण मुले हे कोणत्याही परिस्थितीत भटक्या कुत्र्यांचे शिकार होता कामा नयेत, यावर देखील न्यायालयाने यावेळी भर दिला.
गेल्या महिन्यात कुत्र्यांनी चावा घेतल्याने रेबिज झाल्याच्या घटनांसंबधी माध्यमांमध्ये छापून आलेल्या बातम्यांची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली होती. शहर आणि शहरालगतच्या भागांमध्ये दररोज शेकडो लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर येत आहेत, ज्यामुळे लहान मुले आणि वयस्क हे रेबिज या भीषण आजाराला बळी बडत आहेत, असे न्यायालयाने म्हटले होते.
दरम्यान राजधानी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी दिल्ली महानगरपालिकेने (MSD) लवकरच ते अॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटर्समध्ये सुधारणा करतील आणि झोन निहाय अँटी-रेबिज जागरुकता मोहिम राबवतील असे या महिन्याच्या सुरूवातीलाच जाहीर केले होते.