पीटीआय, नवी दिल्ली

‘पतंजली आयुर्वेद’च्या भ्रामक जाहिरातींविरोधात बजावलेल्या अवमान नोटीसला उत्तर देणे टाळल्याबद्दल योग गुरू बाबा रामदेव यांनी न्यायालयासमोर व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.

तुमच्याविरोधात अवमान कारवाई का सुरू नये, या कारणे दाखवा नोटिसीला तुम्ही उत्तर दिलेले नाही. तुम्ही न्यायालयाला दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन केले असल्याचे प्रथमदर्शनी आढळते, अशा शब्दांत न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने कानउघाडणी केली. यापुढील सुनावणीस रामदेव यांनी व्यक्तिश: न्यायालयापुढे हजर व्हावे, असेही खंडपीठाने बजावले.    

हेही वाचा >>>वडील ‘आयसीयू’मध्ये दाखल झाल्याने गुजरातमधल्या काँग्रेसच्या उमेदवाराची निवडणुकीतून माघार

 रामदेव यांच्यासह ‘पतंजली आयुर्वेद’चे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी औषधे आणि उपाय कायद्याच्या कलम ३ आणि ४ चे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.

भ्रामक जाहिरातींना प्रतिबंध

औषधे आणि चमत्कारिक उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ मधील कलम ३ नुसार विशिष्ट रोग वा व्याधी बऱ्या करण्यासाठी विशिष्ट औषधांची जाहिरात करण्यास प्रतिबंध आहे, तर कलम ४ हे औषधांशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करण्यास मनाई करते.