योगगुरु रामदेवबाबा आणि पतंजली आयुर्वेद संस्थेचे संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी एक आठवड्याच्या आत जनतेची बिनशर्त माफी मागावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात हा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर आता रामदेवबाबांचं या प्रकरणी काय म्हणणं आहे ते समोर आलं आहे.

१० एप्रिलला काय घडलं?

मागच्या आठवड्यात १० एप्रिल रोजी जेव्हा खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती, तेव्हा खंडपीठाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची माफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज दोघांनीही जाहीर माफी मागण्यास तयार असल्याचे सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दाखल केलेल्या नोटिशीला उत्तर देताना त्यांनी ही बिनशर्त माफी मागितली होती. आता पुन्हा एकदा रामदेवबाबांचं म्हणणं समोर आलं आहे.

हे पण वाचा- विश्लेषण : रामदेव बाबांच्या पतंजलीचे दावे फसवे आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने कशाबद्दल फटकारले?

सर्वोच्च न्यायलयाने रामदेवबाबाना विचारणा केली की तुम्हाला तुमचं काही म्हणणं मांडायचं आहे का? त्यावर त्यांचे वकील मुकुल रहतोगी म्हणाले की आम्ही आता कुठलीही फाईल दाखल करणार नाही. तसंच आम्ही (रामदेवबाबा) जाहीर माफी मागायला तयार आहोत. रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी जाहीर माफी मागावी आणि ती वृत्तपत्रात छापावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

मी यापुढे आणखी सजग राहणार-रामदेवबाबा

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीच्या दरम्यान रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याशी चर्चा केली. जस्टिस कोहली म्हणाले स्वामी रामदेव तुम्ही तर जगप्रसिद्ध झाला आहात. योग क्षेत्रात तुमचं योगदान मोठं आहे. तुम्ही व्यवसायातही उतरला आहेत. तुम्हाला आम्ही माफी दिली पाहिजे का? असं विचारलं असता रामदेवबाबा म्हणाले, “माझ्याकडून अजाणतेपणी ही चूक झाली आहे. एका उत्साहात येऊन आम्ही या जाहिराती केल्या. मात्र यापुढे मी अधिक सजग राहिन” असं रामदेवबाबांनी म्हटलं आहे. आज तकने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पतंजलीने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल १७ ऑगस्ट २०२२ पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधांनी काही आजार बरे होत असल्याचा दावा करण्यात आला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने या दाव्यावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.