Supreme Court on ex-IAS officer Puja Khedkar arrest : सर्वोच्च न्यायालयाने माजी प्रशिक्षणार्थी आयएसएस अधिकारी पूजा खेडकरला तात्पुरता दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नागरी सेवा परीक्षेत ओबीसी प्रवर्ग आणि अपंगत्व कोट्याच्या अंतरग्त आरक्षणाचा लाभ घेतल्याप्रकरणी पूजा खेडकरच्या अटकेला १४ फेब्रुवारीपर्यंत स्थगित दिली आहे. त्यामुळे पूजा खेडकरची अटक पुढील काही दिवस तरी टळली आहे.

या प्रकरणी न्यायमूर्ती बी व्ही नागरथना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाबाबत दिल्ली सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC)नोटीस बजावली आहे.

पूजा खेडकरची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा याबाबत बोलताना म्हणाले की, “तिच्या विरुद्ध उच्च न्यायालयाच्या आदेशात काही गंभीर बाबी आढळल्या आहेत. या प्रकरणात खटला चालवला गेला तर, उच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केलेल्या निष्कर्षांमुळे दोषी ठरण्याची दाट शक्यता आहे”.

दरम्यान आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी नागरी सेवा परीक्षा २०२२ साठी आपल्या अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर आयएसएस अधिकारी म्हणून पूजा खेडकरीची निवड रद्द करण्यात आली आहे. इतकेच नाही तर भविष्यात पूजा खेडकरवर पुन्हा नागरी सेवा आयोगाच्या परीक्षेला बसण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

२०२३ च्या बॅचची आयएएस अधिकारी राहिलेल्या पूजा खेडकरवर चुकीच्या पद्धतीने आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी २०२२ च्या आपल्या परीक्षा अर्जात खोटी माहिती दिल्याचाही आरोप आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कोट्याच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्यासाठी स्वत:ची बनावट ओळख सादर केल्याच्या प्रकरणात पूजा खेडकर विरुद्ध फौजदारी कारवाई सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांनी तिच्याविरुद्ध अनेक गुन्ह्यांमध्ये एफआयआरही दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र सरकारने देखील पूजा खेडकरच्या निवड प्रक्रियेचा तपास करण्यासाठी एक सदस्य असलेली समिती स्थापन केली आहे. यादरम्यान माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने तिच्या विरोधातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.