नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पुरेशा पुराव्यांअभावी एका आरोपीची फाशीची शिक्षा रद्द केली. “या प्रकरणात खुनाच्या आरोपावरून आरोपीला शिक्षा सुनावण्यात पंजाबमधील कनिष्ठ न्यायालयाने फाजील उत्साह दाखवला,” अशी कानउघाडणी सर्वोच्च न्यायालयाने केली. या प्रकरणातील संबंधित आरोपीला ११ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला आहे.
हे प्रकरण पंजाबमधील एका खेड्यातील आहे. आरोपीवर आर्थिक कारणामुळे मनात आकस ठेवून पत्नी, वहिनी आणि स्वतःची पाच वर्षांखालील दोन मुले अशा चौघांची हत्या केल्याचा आरोप होता. हा गुन्हा अतिशय दुर्मीळ प्रकारात मोडत असल्याचे सांगत कपूरथलाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी २०२०मध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने २०२४ मध्ये ही शिक्षा कायम ठेवली.
मात्र, फिर्यादी पक्षाच्या साक्षीपुराव्यांमध्ये मोठ्या विसंगती होत्या, त्याच्या जोडीला तपासही सदोष होता असे न्या. विक्रम नाथ, न्या. संजय कारोल आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने बुधवारी स्पष्ट केले. पुराव्याचे मानक हे पूर्णपणे कठोरच आहे, पुरावे पूर्णपणे विश्वसनीयच असले पाहिजेत आणि त्यामध्ये कोणतीही तडजोड चालणार नाही असे न्यायाधीशांनी बजावले. अशा गंभीर गुन्ह्यामध्ये निवाडा करण्याच्या न्यायालयाच्या उत्साहामुळे, आरोपी व्यक्तीला पुरेसे पुरावे नसतानाही हमखास फाशी सुनावली जाते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. जिथे मानवी आयुष्याचा प्रश्न असतो तिथे पूर्णपणे गांभीर्यानेच हाताळणी केली पाहिजे असेही न्यायालयाने स्पष्ट केले.