पीटीआय, नवी दिल्ली

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता.

पहलगाम हल्ल्याचा तपास आणि चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यावर न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्या. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने ताशेरे ओढले. तसेच निवृत्त न्यायाधीश हे तज्ज्ञ नसल्याचे सांगत देशातील प्रत्येक नागरिकाने दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एकजूट केली असताना अशा जनहित याचिका दाखल करून तुम्हाला सुरक्षा दलांचे मनोधैर्य खच्ची करायचे आहे का, असा सवाल करीत अशा प्रकारचे मुद्दे न्यायालयीन क्षेत्रात न आणण्याची तंबीदेखील याचिकाकर्त्याला खंडपीठाने दिली. तसेच याचिकाकर्ता फतेह कुमार साहू आणि इतरांना जनहित याचिका मागे घेण्यास सांगितले.

तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना चौकशी करण्यास सांगत आहात. ते चौकशीत तज्ज्ञ नाहीत पण ते फक्त निर्णय देऊ शकतात आणि एखाद्या मुद्द्यावर निर्णय घेऊ शकतात. आम्हाला आदेश देण्यास सांगू नका. तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जा. – सर्वोच्च न्यायालय