सर्वोच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेसविरोधातील (टीएमसी) जाहिरातींच्या प्रकरणात भारतीय जनता पार्टीला दणका दिला आहे. याप्रकरणी भाजपाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटलं आहे की, “प्रथमदर्शनी तुमच्या जाहिराती चुकीच्याच आहेत”. कोलकाता उच्च न्यायालयाने भाजपाच्या तृणमूलविरोधातील याचिकांवर बंदी घातली होती. उच्च न्यायालयाने भाजपाला सक्त आदेश दिले आहेत की “तुम्ही तृणमूलविरोधात बनवलेल्या जाहिराती ४ जूनपर्यंत (लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत) प्रसारित करू नका”. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने कोलकाता उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. आता सर्वोच्च न्यायालयानेही भाजपाला खडसावलं आहे. न्यायालयाने भाजपाला म्हटलं आहे की, “तुमचा प्रतिस्पर्धी हा तुमचा शत्रू नसतो.”

भाजपाचे वकील पी. एस. पटवालिया यांनी सर्वोच्च न्यायालयाला म्हटलं होतं की, “आमच्या जाहिराती या तथ्यांवर आधारित आहेत”. यावर न्यायमूर्ती जितेंद्र महेश्वरी म्हणाले, “तुम्ही त्यांच्या (टीएमसी) याचिकेतील मुद्दे पाहा. तुमच्या जाहिरातींमधून तुम्ही अनेक मुद्दे मसाला लावून सादर केले आहेत. आम्ही कोलकाता न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास इच्छूक नाही.” यावर पटवालिया म्हणाले, “तिथे (कोलकाता उच्च न्यायालयात) आमचं म्हणणं ऐकूनच घेतलं गेलं नाही. किमान माझा युक्तिवाद तरी ऐकून घ्या.” यावर न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन म्हणाले, “प्रथमदर्शनी तुमच्या जाहिराती खूप अपमानकारक आहेत.”

न्यायालयाने या प्रकरणावर म्हटलं आहे की, “राजकीय कटुता वाढत चालली आहे आणि आम्ही त्यास प्रोत्साहन देऊ इच्छित नाही. अर्थात तुम्ही तुमच्या जाहिराती नक्कीच करू शकता. उच्च न्यायालय तुमचं म्हणणं ऐकून घेत असेल तर आम्ही त्यात आडकाठी करणार नाही.” यावर वकील पटवालिया म्हणाले, “१ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्यावं.” यावर न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन म्हणाले, “अशा जाहिराती तुम्ही करत राहिलात तर त्याचा मतदारांना काहीच फायदा होणार नाही. याचा केवळ तुम्हालाच फायदा होणार आहे.”

हे ही वाचा >> Pune Accident : आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार, डॉक्टरांच्या अटकेनंतर काँग्रेसचा हसन मुश्रीफांवर आरोप; म्हणाले, “अपघाताच्या रात्री…”

न्यायमूर्तींनी भाजपाला खडसावलं

न्यायमूर्ती जितेंद्र महेश्वरी म्हणाले, “हा खटला येथे (सर्वोच्च न्यायालयात) चालवू नये. कोलकाता उच्च न्यायालयाने याप्रकरणी उचित निकाल दिलेला असताना या अनावश्यक बाबींची गरज नाही. आम्ही तुम्हाला निवडणूक लढू नका असं म्हणालो नाही. मात्र यात हस्तक्षेप करण्यास आम्ही इच्छूक नाही. तसेच इथे एक गोष्ट नमूद करणं आवश्यक आहे की, तुमचा प्रतिस्पर्धी हा तुमचा शत्रू नसतो.”