पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १९ मे रोजी एका भरदाव पोर्श कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही कार चालवणारा अल्पवयीन आरोपी त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. मात्र पोलिसांनी त्याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाला पाठवले असता ससूनने वेगळाच अहवाल दिला. या मुलाच्या रक्तात अल्कोहोल आढळलं नसल्याचा अहवाल ससूनच्या डॉक्टरांनी दिला होता. मात्र या मुलाने अपघाताच्या काही वेळ आधी दोन पबमध्ये मद्यपान केल्याचे सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनच्या फॉरेन्सिक विभागातील दोन डॉक्टरांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर अशी या अटक केलेल्या डॉक्टरांची नावं आहेत. तावरे हे ससूनच्या फोरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. अपघातानंतर अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी डॉ. तावरे यांना फोन केला होता, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

ससूनमधील डॉक्टरांवर केलेल्या कारवाईनंतर याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा करणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “ससून रुग्णालयातील ज्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे ते डॉक्टर हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने काम करत होते” असा आरोप कसबा पेठ विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. ते म्हणाले, “मी गेल्या वर्षभरापासून ससून रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारावर बोलतोय मात्र त्यावर आतापर्यंत प्रशासनाने किंवा मंत्र्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही”.

रवींद्र धंगेकर म्हणाले, मी सातत्याने ससून रुग्णालयातील कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मी याआधी डॉ. संजीव ठाकूर यांच्या अटकेची मागणी केली होती. मात्र आजपर्यंत त्यांना अटक झाली नाही. हे सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे डोळे अजून उघडलेले नाहीत. डॉ. तावरेसारख्या लोकांना त्या खुर्चीवर बसवण्याचा प्रताप हसन मुश्रीफ यांनीच केला आहे. जर हसन मुश्रीफच असं वागत असतील तर आपण चांगल्या कारभाराची अपेक्षा तरी कशी करणार? मुळात हे सरकारच घोटाळेबाज आहे, राज्यातील जनता या सरकारला जागेवर आणण्याचं काम करेल. या लोकांनी ससूनमध्ये एक मोठा घोटाळा केला आहे, तो देखील लवकरच जनतेसमोर येईल.

“अपघात झाला त्या रात्री अजय तावरेला कोणाचा फोन आला होता?”

कसबा पेठचे आमदार म्हणाले, डॉ. अजय तावरे याला आज ज्या प्रकरणात अटक झाली आहे असे प्रकार तो वर्षानुवर्षे करत आला आहे. लोकांचे रक्तगट बदलणे, रक्ताचे नमुने बदलणे, रक्ताचे अहवाल बदलणे हा त्याचा नेहमीचा धंदा आहे. ससूनसारख्या सरकारी दवाखान्यात हसन मुश्रीफ यांनी लाडावलेली पिलावळ बसली आहे. ही पिलावळ मुश्रीफांच्याच आशीर्वादाने काम करत आहे. मला वाटतं अपघात ज्या दिवशी झाला त्या रात्री या तावरेला नेमका कोणाचा फोन आला होता याची चौकशी झाली पाहिजे आणि हसन मुश्रीफ यांनी राजीनामा दिला पाहिजे.

हे ही वाचा >> “रुग्णवाहिका येतेय, मृतदेह अर्धा तास शवागृहात ठेवा, अश्विनी कोस्टाच्या पालकांची विनंती रुग्णालयाने धुडकावलेली”, काँग्रेसचा संताप

धंगेकर म्हणाले, तपास अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच मला असं वाटतंय की या प्रकरणात आणखी काही मासे गळाला लागतील. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोलमाल केला आहे तसेच ससूनमध्ये देखील गोलमाल झाला आहे. या लोकांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे.