पती असूनही प्रियकराबरोबर लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने एका विवाहित महिलेला फटकारलं आहे. या महिलेने तिच्या प्रियकरावर लग्न करण्याचे आश्वासन देऊनही लग्न न केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी तिच्यावरही खटला भरला जाऊ शकतो, असं न्यायालयाने म्हटलंय.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बिहारमधील एका महिलेच्या प्रियकराला कोर्टाने जामीन मंजूर केला होता, तो रद्द करण्यात यावा या मागणीसाठी तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यासंदर्भात सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली. प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवले होते, असा आरोप तिने केला होता.
विवाहित असूनही पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाबरोबर शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल तिच्यावर खटला चालवला जाऊ शकतो, असा इशारा यावेळी न्यायालयाने महिलेला दिला. “तू एक विवाहित महिला आहेस, तुला दोन मुलं आहेत. तू सज्ञान आहेस आणि तू लग्नाबाहेर कोणत्या नात्यामध्ये अडकत आहेस हे तुला समजतं,” अशी टिप्पणी न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि एन कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान केली.
प्रियकर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेबरोबर लैंगिक संबंध ठेवत होता, असं तिच्या वकिलाने कोर्टात म्हटलं. महिलेच्या वकिलांनी असाही आरोप केला की, महिलेला प्रियकराने लग्नाचे आश्वासन देऊन, अनेक वेळा वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये सेक्ससाठी बोलावलं होतं. यावर “तो बोलावत होता म्हणून तू वारंवार हॉटेलमध्ये सेक्ससाठी का गेली होतीस?” असा प्रश्न खंडपीठाने महिलेला विचारला.
“तू लग्नाबाहेर लैंगिक संबंध ठेवून गुन्हा केला आहेस हे तुला ठाऊक आहे,” असं कोर्टाने महिलेला म्हटलं. यासंदर्भात न्यूज १८ ने वृत्त दिले आहे.
नेमके प्रकरण काय?
अंकित बर्नवाल व विवाहित महिला दोघांची ओळख २०१६ मध्ये सोशल मीडियावर झाली होती, नंतर ते रिलेशनशिपमध्ये होते. अंकितने दबाव टाकल्याने या महिलेने तिच्या पतीपासून घटस्फोट मागितला होता, ६ मार्च रोजी कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला होता, असा आरोप महिलेने केला. अंकितविरोधात तिने बलात्काराची तक्रार दिली होती.
ट्रायल कोर्टाने अंकितचा अटकपूर्व जामीन नाकारला होता, त्यानंतर अंकितने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पटना उच्च न्यायालयाने अंकित बर्नवालला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तसेच या विवाहित महिलेची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर महिला सुप्रीम कोर्टात गेली होती.
महिलेने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर अंकितने तिच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवले नव्हते, असे रेकॉर्डवरून आढळून आले. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.