सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीच्या फसव्या जाहिरांतीप्रकरणी मंगळवारी (३० एप्रिल) झालेल्या सुनावणीवेळी उत्तराखंड परवाना प्राधिकरणाला (उत्तराखंड लायसन्सिंग अथॉरिटी) फटकारलं. न्यायालयाने पंतजलीच्या फसव्या जाहिरांतीप्रकरणी प्राधिकरणाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की, “तुमची झोप आत्ता पूर्ण झाली का? नुकतेच झोपेतून जागे झालात असं वाटतंय.” मंगळवारच्या सुनावणीवेळी महाधिवक्ते मुकुल रोहतगी यांनी योग गुरू रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची बाजू मांडली. रोहतगी म्हणाले, आम्ही वर्तमानपत्रांमध्ये माफीनामा छापला होता. तो माफीनामा न्यायालयाने आपल्याकडे जमा केला आहे. यासह रोहतगी यांनी पंतजलीचा माफीनामा न्यायमूर्तींसमोरही सादर केला.

न्यायालयाने मुकूल रोहतगी यांना प्रश्न विचारला की, तुम्ही मूळ नोंदी का सादर केल्या नाहीत. तुमच्याकडे मागितलेली माहिती ई-फायलिंग स्वरुपात सादर करण्यात आली आहे जी अधिक गोंधळ निर्माण करणारी आहे. तुमचा हा सगळा गोंधळ पाहून आम्ही आता हात वर केले आहेत. आम्ही मूळ प्रती मागितल्या होत्या, त्या कुठे आहेत, त्या कधी सादर करणार?

न्यायमूर्तींनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर रामदेव यांचे वकील बलबीर सिंह म्हणाले, माझ्याकडून हे चुकून झालंय. त्यानंतर न्यायमूर्ती म्हणाले, मागच्या वेळी तुम्ही जो माफीनामा छापला होता तो खूप छोटा होता. तसेच त्यावर केवळ पतंजली लिहिलं होतं. यावेळी तुम्ही थोडा मोठा माफीनामा छापलाय ते बरं केलंत. यावरून स्पष्ट होतंय की आम्ही नेमकं काय म्हणतोय ते तुम्हाला समजतंय. तुम्ही आता जाहिरात छापलेलं वर्तमानपत्र जमा करा.

हे ही वाचा >> “…म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले”, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं पंतप्रधान मोदींकडून विश्लेषण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने न्यायालयाला सांगितलं की, पंतजली आणि त्यांची दुसरी शाखा दिव्या फार्मसीच्या एकूण १४ मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यावर न्यायमूर्ती म्हणाले, तुम्ही आत्ता झोपेतून उठलात वाटतं. यावरून एक गोष्ट समजतेय की, जेव्हा तुम्हाला खरंच काहीतरी करायचं असतं तेव्हा तुम्ही वेगाने कामं करता. परंतु जेव्हा तुम्हाला काही करायचंच नसतं तेव्हा तुम्ही कितीही सांगितलं तरी कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नाही. अशा वेळी तुम्हाला एखादी गोष्ट करायला अनेक वर्षं लागतात. आम्ही सुनावणी केल्यानंतर तीनच दिवसांत तुम्ही कारवाई केलीत. मात्र यापूर्वीचे नऊ महिने तुम्ही काय करत होता? तुम्ही आत्ताच झोपेतून जागे झालात असं दिसतंय.