राफेल डील आणि केरळमधील शबरीमला मंदिर प्रवेश या महत्वाच्या प्रकरणांबाबत सुप्रीम कोर्टात दाखल याचिकांवर उद्या (गुरुवार) निकाल येणार आहे. या दोन्ही प्रकरणांवर सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणावंर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश गोगोई येत्या १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार असल्याने तत्पूर्वी ते या महत्वाच्या प्रलंबित प्रकरणांवर निर्णय देणार आहेत.

केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली होती. मात्र, कोर्टाच्या या निर्णयाला अनेक धार्मिक संघटनांनी विरोध केला होता. हे परंपरांचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आपल्या या निर्णयावर पुनर्विचार करावा यासाठी १९ फेरविचार याचिका कोर्टात दाखल झाल्या होत्या. या याचिकांवर उद्या (गुरुवार) सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे.

राफेलप्रकरणी एसआयटी चौकशीसाठी फेरविचार याचिका

सुप्रीम कोर्टाने राफेल लढाऊ विमान खरेदीप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी यापूर्वीच फेटाळून लावली होती. त्यानंतर याप्रकरणी काही नवी तथ्ये समोर आल्यानंतर फेरविचार याचिका दाखल करुन घेतली होती. आता या प्रकरणावरही कोर्ट आपला निर्णय देणार आहे.

राफेलप्रकरणी राहुल गांधींवरील अब्रुनुकसानीच्या याचिकेवरही निर्णय

भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता, यावरही सुप्रीम कोर्ट उद्या निर्णय देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील ‘चौकीदार चोर है’ची घोषणा त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. याविरोधातच त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता.