करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य व्यवस्थांची कमतरता असल्याने अनेकांना आपल्या नातेवाईकांसाठी धावपळ करावी लागली. करोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झालेला औषध तुटवडा, ऑक्सजिन तुटवडा आणि बेड्सच्या तुटवड्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप राज्यांकडून केला जात आहे. त्यामुळेच या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचं बोललं जात आहे. मात्र मोदींवर पीएचडी करणाऱ्या गुजरातमधील मेहुल चोक्सी या व्यक्तीने, “सध्याच्या परिस्थितीमध्ये मोदींची लोकप्रियता कमी झाली असली तरी आज सुद्धा अनेकांच्या हृदयामध्ये मोदींना अढळ स्थान आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा मोदीच सत्तेत येतील,” असा विश्वास व्यक्त केलाय.

सूरतमध्ये राहणाऱ्या मेहुल चोक्सीने पंतप्रधान मोदींवर पीएचडी केली आहे. “लीडरशीप अंडर गव्हर्मेंट- केस स्टडी ऑफ नरेंद्र मोदी”, हा विषय घेऊन मेहुल यांनी संशोधन केलं आहे. या संसधोनामध्ये त्यांनी साडेचारशे जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यामध्ये सरकारी कर्मचारी, अधिकारी, शेतकरी, विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग होता. मेहुल यांनी मोदींच्या नेतृत्वासंदर्भातील काही समान प्रश्न या मुलाखतींमध्ये विचारले होते. या संशोधनादरम्यान मोदींची भाषणं ही जनतेला खूप आकर्षक वाटतात असं मेहुलला दिसून आलं.

नक्की वाचा >> इंधनदरवाढ हे केंद्र सरकारचं अपयश; मोदींचं ९ वर्षांपूर्वीचं ते ट्विट पुन्हा चर्चेत

या संशोधनामध्ये ४८ टक्के लोकांनी मोदी राजकीय मार्केटींगमध्ये उत्तम असल्याचं मत व्यक्त केलं. मात्र सध्याच्या करोना परिस्थितीमुळे मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख खाली जाताना दिसत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्ली- पश्चिम बंगालसारख्या निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाल्याचं पहायला मिळाला नाही. यासंदर्भात बोलताना मेहुल यांनी करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाची जगभरामध्ये चर्चा झाल्याचं सांगतात. दुसऱ्या लाटेच्या व्यवस्थापनामध्ये मात्र नक्कीच काही उणीवा होत्या. त्यामुळे लोकांनी आपला संताप उघडपणे प्रसारमाध्यमांसमोर आणि सोशल नेटवर्किंगवरुन व्यक्त केला. मात्र असं असलं तरी मोदींच्या प्रतिमेवर याचा काहीही परिणाम झालेला नाही, असा दावा मेहुल यांनी ‘आज तक’शी बोलताना केलाय. आजही मोदींवर लोकांना विश्वास आहे. सध्याच्या परिस्थितीचा आगामी निवडणुकांमध्ये फार फरक पडणार नाही, असं मेहुल यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींवर पीएचडी करणाऱ्या मेहुल यांनी २०१० मध्ये आपलं थीसिस लिहीलं होतं. तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मेहुल यांनी आपल्या संशोधनामध्ये मोदींशी संबंधित प्रश्न विचारले होते. यावेळी ५१ टक्के लोकांनी सकारात्मक तर ३४.२५ टक्के लोकांनी नकारात्मक मत नोंदवलं. लोकप्रियता मिळवण्यासाठी नेत्यांना लोकांच्या दृष्टीने योग्य वाटणारे निर्णय घ्यावे लागतात असं मत ४६.७५ टक्के लोकांनी व्यक्त केलेलं.

करोना कालावधीमध्ये प्रशासनाच्या अपयशामुळे पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निकालामध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही, असं विश्लेषण मेहुल चोक्सी यांनी केलं आहे. भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार पुन्हा मोदींच्या पारड्यात मत टाकतील असंही मेहुल यांनी सांगितलं आहे.