अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी खासदार सुष्मिता देव यांनी आज सकाळी पक्षाला सोडचिठ्ठी देत आयुष्यातील ‘न्यू चॅप्टर’चा सूचक इशारा दिला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्या आयुष्यातला हा न्यू चॅप्टर म्हणजे तृणमूल काँग्रेस असल्याचं स्पष्ट झालं. सुष्मिता देव यांनी काँग्रेसला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वावर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. कपिल सिब्बल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस हाय कमांडकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुष्मिता देव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सोमवारी सकाळी एक पत्र पाठवलं आहे. आपल्या पत्रालाच राजीनामा समजण्यात यावं, अशी विनंती देखील सुष्मिता देव यांनी केली आहे. आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी यात नमूद केलं आहे. तसेच, पक्षातील इतर सदस्यांचे, नेत्यांचे त्यांनी आभार मानले आहे.

सोनिया गांधींचे मानले आभार!

“भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत गेल्या तीन दशकांचा माझा प्रवास मला कायम लक्षात राहील. या निमित्ताने मी पक्षाचे, पक्षाच्या सर्व नेत्यांचे, सदस्यांचे आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानते. माझ्या या प्रवासात तुम्ही सर्वजण माझ्यासोबत होतात. मॅडम, तुम्ही मला दिलेल्या संधीसाठी आणि तुमच्या मार्गदर्शनासाठी मी तुमचे वैयक्तिकरीत्या आभार मानते. हा अनुभव माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता”, असं आपल्या पत्रात सुष्मिता देव यांनी नमूद केलं आहे.

 

“…पक्ष डोळे मिटून पुढे जात राहातो!”

दरम्यान, या सुष्मिता देव यांनी राजीनामा दिल्यानंतर कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षनेतृत्वाला खडसावलं आहे. “सुष्मिता देव यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे तरुण नेते जेव्हा सोडून जातात, तेव्हा आमच्यासारखे ज्येष्ठ पक्षाला मजबूत करण्यात कमी पडल्याचं खापर फोडलं जातं. पक्ष डोळे मिटून पुढे जात राहातो”, असं ट्वीट कपिल सिब्बल यांनी केलं आहे.

 

गेल्या वर्षी काँग्रेसमधील एकूण २३ महत्त्वाच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं होतं. यामध्ये पक्षांतर्गत व्यवस्था सुधारण्यासंदर्भात आणि नेतृत्वामधील सुधारणांविषयीही सल्लावजा मागणी करण्यात आली होती.

 

“मॅडम, तुमचे आभार…” म्हणत अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षांचा राजीनामा!

सुष्मिता देव यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया

दरम्यान, सुष्मिता देव यांच्या सोडचिठ्ठीनंतर काँग्रेसकडून प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी त्यांच्याशी बोलल्यानंतरच प्रतिक्रिया देणार असल्याचं सांगितलं. “मी सुष्मिता देव यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा फोन बंद आहे. त्या एक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्या होत्या, कदाचित आजही आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अजूनही त्यांच्याकडून कोणतंही पत्र मिळालेलं नाही”, असं रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita dev left congress joins tmc in kolkata kapil sibal gets angry with leadership pmw
First published on: 16-08-2021 at 16:52 IST