व्हाइट हाऊसनजीक सुरक्षेच्या कारणास्तव उभारली गेलेली बॅरिकेडस् ओलांडून कारमधून पळून जाणाऱ्या महिलेला सुमारे दोन मैलांचा पाठलाग करून पोलिसांनी ठार मारले. या धावपळीत अमेरिकेच्या गुप्तचर खात्यातील एका अधिकाऱ्यासह दोन पोलीस जखमी झाले.
एक महिला एक वर्षांच्या लहान मुलासह गाडीतून जात होती. गुरुवारी मध्यरात्री व्हाइट हाऊसजवळील तपास केंद्राजवळ उभ्या करण्यात आलेल्या बॅरिकेडस्ना ठोकर देऊन सदर महिला आपली गाडी पुढे नेऊ लागली. या वेळी एक गुप्तचर पोलीस महिलाही जखमी झाली. या दुर्घटनेमुळे भयभीत झाल्यामुळे असेल किंवा अन्य कारणामुळे, पण सदर महिला अधिक वेगाने कॅपिटॉल या सुरक्षा इमारतीकडे सरकू लागली. त्यामुळे पोलिसांनी तिचा पाठलाग सुरू केला. तसेच ती बधत नसल्याचे पाहून सुरक्षेच्या कारणास्तव तिच्यावर गोळीबाराच्या दोन फैरीही झाडल्या. या गोळीबारात त्या वाहनचालक महिलेचा मृत्यू झाला.  
तपास अधिकाऱ्यांनी सदर महिलेचा कोणत्याही अतिरेकी संघटनेशी संबंध नसल्याचे तसेच ती नि:शस्त्र असल्याचे स्पष्ट केले. ज्या गाडीतून ती जात होती ती गाडी, स्टॅनफोर्ड येथील ३४ वर्षीय मिरियम कॅरे या दंतचिकित्सक महिलेच्या नावावर नोंदविली आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली. तसेच गाडीतील चिमुरडय़ास वाचविण्यात यश आल्याचेही पोलिसांनी नमूद केले.