Uttar Pradesh Cow Smugglers : उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात शनिवारी रात्री पोलिसांशी झालेल्या चकमकीत एका संशयित गोवंश तस्कराचा मृत्यू झाला असून त्याचे दोन साथीदार जखमी झाले आहेत. तसंच, या चकमकीत एका पोलिसाचाही मृत्यू झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मृत झालेल्या संशयित गोवंश तस्कराचं नाव सलमान असून तो जौनपुरचा रहिवासी होता. त्याचे सहकारी नरेंद्र यादव आणि गोलू यादव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, त्यांचे आणखी तीन सहकारी राहुल यादव, राजू यादव आणि आझाद यादव पळून जाण्यात यशस्वी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर, हेड कॉन्स्टेबल दुर्गेश कुमार सिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, जखमी संशयितांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी रात्री या टोळीने परौगंज पोलीस चौकीच्या प्रभारी उपनिरीक्षक प्रतिमा सिंग यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाहनावर धडक दिली. या घटनेत सिंग गंभीर जखमी झाल्या आणि त्यांच्यावर वाराणसीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यात सहभागी असलेल्या पिकअप व्हॅनचा शोध घेण्यासाठी वाहन तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी खुज्जी क्रॉसिंगवर एका पोलीस पथकाने वाराणसीकडे जाणाऱ्या एका पिकअप वाहनाला थांबण्याचा इशारा केला. परंतु, पिकअप वेगाने आला आणि हेड कॉन्स्टेबल दुर्गेश कुमार सिंग यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना धडक दिली. दुर्गेश यांना वाराणसीतील रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कशी झाली चकमक

पोलिसांच्या एका पथकाने हल्लेखोरांचा पाठलाग केला. संशयितांनी त्यांचं वाहन वाराणसी जिल्ह्यातील ताला बेला गावात सोडलं. तिथून ते दुचाकीवरून जौनपुरला परतत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी जौनपूरच्या चांदवाक गावात शोधमोहिम केली. तिथे पोलिसांनी हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात सलमानचा मृत्यू झाला. तर, नरेंद्र यादव आणि गोलू यादव जखमी झाले आहेत. फरार संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.