scorecardresearch

मोठी बातमी, पंतप्रधान मोदी दौऱ्यावर असतानाच जम्मूत ड्रोनद्वारे IED स्फोट झाल्याचा संशय

मोदींच्या रॅलीआधीच जम्मूमध्ये एक संशयास्पद स्फोट झालाय.

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर रविवारी (२४ एप्रिल) पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू दौऱ्यावर आले आहेत. मात्र, मोदींच्या रॅलीआधीच जम्मूमध्ये एक संशयास्पद स्फोट झालाय. दहशतवादी संघटनांनी ड्रोनच्या मदतीने आयईडी (IED) स्फोट घडवून आणल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केलाय. हा स्फोट जम्मूमधील बिश्नाह भागात ललियन गावात हा स्फोट झाला. याबाबत स्थानिक रहिवाशांनी माहिती दिलीय. यानंतर सुरक्षा दलाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

विशेष म्हणजे जम्मूमधील ज्या गावात हा स्फोट झाला त्या गावातील रहिवाशांनी या स्फोटाआधी ड्रोनच्या उड्डाणाप्रमाणे आवाज ऐकल्याचं म्हटलंय. स्फोटामुळे ज्या ठिकाणी जमिनीवर खड्डा तयार झाला त्याजवळील गावकऱ्यांच्या घरांच्या भिंतींना तडे गेले, तर खिडक्यांच्या काचा फुटल्याचं सांगितलंय.

ज्या ठिकाणी स्फोट झाला ते पंतप्रधान मोदींच्या रॅलीच्या ठिकाणापासून जवळ आहे. त्यामुळे सुरक्षा दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल या स्फोटाचा ड्रोन हल्ल्याच्या दृष्टीने देखील तपास करत आहे. एका उच्च अधिकाऱ्याने इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना जैश आणि लष्कर-ए-तोयबासारख्या संघटना पंतप्रधान मोदींच्या रॅलीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन्ही दहशतवादी संघटनांकडे ड्रोन असल्याने ड्रोन हल्ल्याचा संशय बळावला आहे.

पंतप्रधान मोदींची रॅली आंतरराष्ट्रीय सीमेपासून १० किलोमीटरच्या अंतरावर होत आहे. त्यामुळे या रॅलीला दहशतवाद्यांकडून धोका वर्तवला जात आहे. त्यामुळेच एनएसजीसह बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमारेषा भागात आपले ड्रोन तैनात केलेत.

हेही वाचा : अफ्स्पा कायदाचा गैरवापर, ‘फेक एन्काऊंटर’मध्ये ३ मजुरांच्या हत्याप्रकरणी कॅप्टन भूपेंद्र सिंहवर ‘कोर्ट मार्शल’ची कारवाई

सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी हा भूगर्भांतर्गत हालचाली किंवा वीज पडल्याने झालेला आवाज असावा असा अंदाज वर्तवला होता. एनएसजीने या परिसराची नाकेबंदी करून स्फोट झालेल्या ठिकाणच्या मातीचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suspicious blast in jammu on day of pm modi rally pbs