scorecardresearch

स्वेतलाना अ‍ॅलेक्सीविच यांना साहित्यातील नोबेल

६७ वर्षीय अ‍ॅलेक्सीविच या नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या चौदाव्या लेखिका आहेत.

स्वेतलाना अ‍ॅलेक्सीविच यांना साहित्यातील प्रतिष्ठेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले
पत्रकारिता आणि साहित्य यांच्या सीमेवरील लेखणीचा गौरव
समाजातील दु:ख, धैर्य यांचे बहुस्वरीय आणि बहुस्तरीय वर्णन करणाऱ्या बेलारुसच्या लेखिका आणि पत्रकार स्वेतलाना अ‍ॅलेक्सीविच यांना साहित्यातील प्रतिष्ठेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. विशेष म्हणजे यंदा पुरस्काराच्या घोषणेपूर्वीपासूनच वाचकप्रिय जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्याहून अधिक पसंती अ‍ॅलेक्सीविच यांना मिळाली होती.

६७ वर्षीय अ‍ॅलेक्सीविच या नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या चौदाव्या लेखिका आहेत. त्यांनी आपल्या साहित्यिक पत्रकारितेमधून भावना आणि आत्म्याचा इतिहास रचला आहे. वेदनांना पुरून उरणाऱ्या मानवी धैर्याच्या कहाण्या आपल्या लेखनातून त्यांनी सांगितल्या असल्याचे, स्वीडिश अकादमीने त्यांचा गौरव करताना नमूद केले आहे.

दुसऱ्या महायुद्धात लढण्यासाठी उतरलेल्या शेकडो महिलांच्या मुलाखतींतून त्यांनी लिहिलेले ‘वॉर्स अनवुमनली फेस’ हे त्यांचे पुस्तक सर्वाधिक गाजले. सर्वसामान्य माणसाच्या नजरेतून सोव्हिएत युनियनमधील जीवन तंतोतंत रेखाटणाऱ्या लेखिका म्हणून अ‍ॅलेक्सीविच ओळखल्या जातात.

चेर्नोबिल अणुदुर्घटनेनंतर १० वर्षे या परिसराला पिंजून काढून त्यातील पीडित आणि बाधित वेदनांना शब्दबद्ध करीत त्यांनी ‘व्हॉइस फ्रॉम चेर्नोबिल : द ओरल हिस्टरी ऑफ ए न्युक्लिअर डिझास्टर’ हे पुस्तक अनुवादाद्वारे अमेरिकेत गाजले. लोकांच्या मनातील भीती शब्दबद्ध करताना अ‍ॅलेक्सीविच यांनी लिहिलेली पुस्तके अनेक भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले. या पुस्तकांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.

बेलारुसमध्ये हुकूमशाही पद्धतीने राज्य करणारे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी त्यांच्या पुस्तकांवर देशात र्निबध आणण्याचे प्रयत्न केले. माहितीपट, चित्रपट, नाटके आणि पटकथांसाठीही अ‍ॅलेक्सीविच यांनी लेखन केले आहे. साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या अ‍ॅलेक्सीविच या केवळ १४व्या महिला ठरल्या. शुक्रवारी सर्वाचेच लक्ष असलेले शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात येणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात येणार आहे. नोबेल पारितोषिक वितरण १० डिसेंबर रोजी स्टॉकहोम आणि ओसलो येथे करण्यात येणार आहे.

साहित्य आणि पत्रकारितेच्या सीमेवर वावरणाऱ्या त्यांच्या लेखणीतून दुसऱ्या महायुद्धातून बचावलेल्या नागरिकांच्या व्यथा आणि कथा साकारल्या आहेत. अफगाणिस्तानमधील सोव्हिएत दडपशाहीचा काळ आणि चेर्नोबिल दुर्घटनेचे त्यांचे रिपोर्ताज विशेष गाजले आहेत. कथावृत्तांताच्या प्रकाराला त्यांनी जन्म दिला हे त्यांचे सर्वात मोठे योगदान असल्याचे नोबेल साहित्य अकादमीने म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Svetlana alexievich wins nobel prize in literature