‘दिवगंत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला जाताना माझ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यातून मी वाचलो पण माझ्यासह अनेकांवर दररोज हल्ले होत आहेत. ही निषेधार्थ बाब असून आपण ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली आहे, त्यांच्याकडून हिंसेच्या घटनांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे’ अशा शब्दात स्वामी अग्निवेश यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली. पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्व भारतीय संविधान समर्थक परिवर्तनवादी संघटनेच्या वतीने ‘हिंसा के खिलाफ, मानवता के और’ या मोहीमे अंतर्गत धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी राज्य संकल्प परिषद या विषयावर ज्येष्ठ विचारवंत स्वामी अग्निवेश यांनी व्याख्यान दिले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे नेते आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील तसेच तरुणवर्ग सहभागी झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी स्वामी अग्निवेश म्हणाले की, देशातील प्रत्येक ठिकाणी हिंसेच्या घटना घडत आहेत. या घटना अशाच सुरू राहिल्यास देशात गंभीर परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, देशातील सत्ताधार्यांच्या विचाराविरोधात काही बोलल्यास देशद्रोहासारखा गुन्हा दाखल केला जातो. या सरकारने हार्दिक पटेलसारख्या तरुणावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल केला. तर मला देखील देशद्रोही ठरवले जात आहे. या सरकारने कितीही दबाव आणला तरी आम्ही चुकीच्या कार्यपद्धतीवर बोलणारच असे ते म्हणाले. या सर्व घटना आणि केंद्र सरकारचा कारभार पाहता देशाची लोकशाही धोक्यात आली आहे, असंही ते म्हणाले.

ज्या विचारवंताची मागील पाच वर्षांमध्ये हत्या झाली. त्यांचे कार्य समाजासाठी खूप मोठं कार्य असून पुढील पिढीला या विचारवंतांचे काम कायम प्रेरणा देत राहील आणि त्यांचा वारसा तरुण वर्गाने पुढे घेऊन जाण्याची गरज आहे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swami agnivesh slams modi government and bjp in pune
First published on: 09-09-2018 at 12:50 IST