हॉलिवूडनंतर आता साहित्याचे नोबेल देणाऱ्या दी स्वीडिश अॅकॅडमी या संस्थेलाही लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनी डागाळले असून या संस्थेशी संबंधित एका प्रभावशाली व्यक्तीने आमच्याशी लैंगिक कृत्ये केली, असा आरोप अॅकॅडमीचे सदस्य, त्यांच्या पत्नी व मुली यांनी ‘मी टू’ या हॅशटॅग मोहिमेअंतर्गत केला आहे. कला, माध्यमे व राजकीय वर्तुळात लैंगिक छळाच्या कहाण्यांचा सिलसिला सुरू असताना नोबेल पारितोषिक देणाऱ्या प्रतिष्ठित संघटनेची प्रतिमाही यामुळे डागाळली आहे.
स्वीडन हा लिंगभाव समानतेत जगात अग्रक्रम असलेला देश असून तेथे महिला व मुलींनी अशा तक्रारी केल्याने सर्वाना धक्काच बसला आहे. स्वीडनच्या साहित्य वर्तुळात मंगळवारी खळबळ उडाली असून ‘डॅगेन्स नेटर’ या वृत्तपत्राने बातमी दिली आहे. एकूण अठरा महिलांनी केलेल्या आरोपानुसार सांस्कृतिक क्षेत्रातील दी स्वीडिश अॅकॅडमीशी संबंधित असलेल्या प्रतिष्ठित व्यक्तीने आमच्यावर लैंगिक अत्याचार व बलात्कार केले. यातील आरोपीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. पण ती व्यक्ती कोण हे तेथील लोकांना माहिती आहे. कारण सांस्कृतिक वर्तुळात त्या व्यक्तीचे नाव आहे. सदर व्यक्तीने या आरोपांवर काही प्रतिक्रिया दिली नसली, तरी आपण निरपराध आहोत, असे संबंधित वृत्तपत्राला सांगितले आहे. त्याचा विवाह एका लेखिकेशी झालेला असून त्याचे स्वीडिश अॅकॅडमीशी घनिष्ठ संबंध आहेत. ती व्यक्ती सांस्कृतिक क्लब चालवणारी असून अभिवाचन, प्रदर्शने असे अनेक कार्यक्रम या क्लबकडून आयोजित केले जातात. या क्लबला अॅकॅडमीकडून निधी दिला जातो. वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सदर व्यक्तीने १९९६ ते २०१७ या काळात क्लबच्या आवारातच लैंगिक अत्याचार केले असून संबंधित महिलांनी जाहीरपणे हा आरोप करीत नावासह छापण्यास सांगितले होते.
अनेक महिलांच्या तक्रारी
स्टॉकहोम येथे एका आलिशान अपार्टमेंटमध्ये या व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला, असे एका महिलेने सांगितले. तो तरुण मुली व महिलांना शिकार करतो हे सर्वाना माहिती आहे. त्याचे प्रकाशक, निर्माते, दिग्दर्शक व संगीतकार यांच्याशी चांगले संबंध आहे, असेही तिने सांगितले. दी स्वीडिश अॅकॅडमीने या व्यक्तीशी संबंध तोडण्यात येत असल्याचे कालच्या बैठकीनंतर जाहीर केले. या आरोपी व्यक्तीचा २०१५ मध्ये ‘ऑर्डर ऑफ पोलिर स्टार’ हा सन्मान देऊन सत्कार केल्याबद्दल सांस्कृतिकमंत्री अलाइस बाह कुहन यांनी खेद व्यक्त केला आहे.