समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा तैवान हा आशिया खंडातला पहिला देश ठरला आहे. तैवानच्या संसदेने समलिंगी विवाहांना कायदेशी मान्यता दिली आहे. समलिंगी जोडप्यांनी त्यांची एक संघटना स्थापन करावी असी संमती देशाच्या विधीमंडळाने दिली. ज्या समलिंगी जोडप्यांना विवाह करायचा असेल त्यांना शासकीय विवाह नोंदणी कार्यालयात अर्ज करता येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान हा निर्णय तैवान या देशाच्या घटनेचं उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे २४ मे पर्यंत या संदर्भातली घटना दुरूस्ती करण्याची मुदत तैवानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.
आणखी वाचा – जाणून घ्या समलैंगिकता म्हणजे काय?
समलिंगी विवाहासाठी कायदा करावा की करू नये यासाठी मतदान घेण्यात आलं. यावेळी प्रचंड पाऊस पडला तरीही अनेक समलिंगी जोडप्यांनी मतदानाला हजेरी लावली होती. तैवानमध्ये मोठ्या प्रमाणावर समलिंगी जोडपी रहातात. समलिंगी विवाहाला मान्यता मिळावी अशी या सगळ्यांचीच इच्छा होती. यासाठी जे मतदान झालं त्यामध्ये ६७ टक्के लोकांनी समलिंगी विवाहांना मान्यता देण्याच्या बाजूने मतदान केलं. देशाने समानतेच्या दृष्टीने एक मोठं पाऊल उचललं आहे अशी प्रतिक्रिया समलिंगी जोडप्यांनी या निर्णयानंतर दिली आहे.
आणखी वाचा – ‘या’ देशाने ‘गे रिलेशन’ला दिली परवानगी; भारतातही समलैंगिक विवाहांसाठी सुरु आहे न्यायालयीन लढाई
तैवानमध्ये समलिंगी विवाहाचा कायदा लागू करण्यात यावा यासाठी ची चिया वेई यांनी सुमारे ३० वर्षे लढा दिला. त्यांनी २०१५ मध्ये कोर्टात यासंबंधीची एक याचिकाही दाखल केली होती. तैपेई शहर प्रशासनानेही समलिंगी जोडप्यांच्या विवाहाला मान्यता मिळावी म्हणून कोर्टात अर्ज दाखल केला होता. तैपेईत वास्तव्य करणाऱ्या तीन समलिंगी जोडप्यांनी लग्नासाठी विवाह नोंदणी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज नाकारण्यात आल्याने या तिन्ही समलिंगी जोडप्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. ज्यामुळे तैपेई शहर प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. आता समलिंगी विवाहाला मान्यता द्यावी या मागणीसाठी जो लढा दिला जात होता त्याला यश मिळालं आहे अशी प्रतिक्रिया काही जोडप्यांनी दिली.