इस्लामिक वातावरण तयार होईपर्यंत काबूल विद्यापीठात यापुढे महिलांना वर्गात जाण्याची किंवा काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं तालिबानने नियुक्त केलेल्या कुलपतींनी जाहीर केलं आहे.”जोपर्यंत सर्वांना खरे इस्लामिक वातावरण उपलब्ध होत नाही, तोपर्यंत महिलांना विद्यापीठांमध्ये येण्याची किंवा काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही,” असं मोहम्मद अशरफ घैरत यांनी सोमवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. यासंदर्भात सीएनएनने वृत्त दिलंय.

विद्यापीठासंदर्भातील तालिबानचे हे नवे धोरण ते १९९०मध्ये जेव्हा पहिल्यांदा सत्तेत आले होते, तेव्हाच्या धोरणांसारखेच आहे. त्यावेळी स्त्रियांना केवळ पुरुष नातेवाईकांसह सार्वजनिक ठिकाणी जाण्याची परवानगी होती. या नियमाचं उल्लंघन केल्यास स्त्रियांना मारहाण केली जात असे आणि त्यांना शाळेतून काढण्यात येत होतं.  न्यूयॉर्क टाइम्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दशकांपासून स्वतंत्रपणे काम करणाऱ्या काही महिला कर्मचारी सदस्यांनी इस्लामी विश्वासाची व्याख्या करण्यावर तालिबानची मक्तेदारी आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्या या नवीन नियमांना विरोध केला आहे. “या पवित्र ठिकाणी, गैर-इस्लामिक काहीही नव्हते. अध्यक्ष, शिक्षक, इंजिनिअर आणि अगदी मुल्लांना देखील इथे प्रशिक्षण दिले जाते. काबूल विद्यापीठ हे अफगाणिस्तान राष्ट्राचे घर आहे,” असं एका महिला प्राध्यापकानं न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना म्हटलंय. 

तालिबानने पीएचडी धारक कुलगुरू मुहम्मद उस्मान बाबूरी यांची हकालपट्टी केल्यानंतर आणि त्यांच्या जागी बीए पदवीधर मोहम्मद अशरफ घैरत यांची नियुक्ती केली आहे. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापकांसह काबुल विद्यापीठाच्या सुमारे ७० शिक्षण कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. काबुलमधील सर्वात मोठ्या विद्यापीठात घैरत यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती केल्याचा सोशल मीडियावर निषेध केला जात आहे.