तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. आज (२५ ऑगस्ट) सकाळी सुरू झालेल्या या बैठकीत केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना भारताच्या बचावकार्य आणि संपूर्ण परिस्थितीविषयी माहिती देत आहेत. या बैठकीदरम्यान बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले कि, “तालिबान आपल्या शब्दावर ठाम राहिले नाहीत. दोहामध्ये त्यांच्या नेत्यांनी दिलेला शब्द पाळला नाही.” त्याचप्रमाणे, भारत अफगाणिस्तानातून जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

१५,००० लोकांनी साधला भारत सरकारशी संपर्क

अफगाणिस्तानमधील १५,००० लोकांनी भारत सरकारच्या हेल्पडेस्कशी संपर्क साधला असून आपल्याला देशातून बाहेर काढण्याची विनंती केली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली आहे.

भारताच्या बचाव मोहिमेचा आढावा

एस जयशंकर हे या बैठकीदरम्यान भारतामार्फत अफगाणिस्तानात सुरू असलेल्या बचाव मोहिमेबद्दल माहिती देतील. किती भारतीय परतले आहेत? आणखी किती जणांना अजूनही बाहेर काढायचे आहे?अफगाणी मित्र आणि अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना बाहेर काढणं, तालिबानशी संबंध आणि गुंतवणूकीची सुरक्षा याविषयी देखील या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीत भारताने १६ ऑगस्ट रोजी आपल्या स्थलांतर आणि बचाव मोहिमेला सुरुवात केली असून आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त जणांना देशात आणलं आहे. ह्यात अनेक अफगाणिस्तान शीख आणि हिंदूंचा देखील समावेश असल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंसंस्थेने दिली आहे.