काबूल  : अफगाणी महिलांनी सार्वजनिक स्थळी डोक्यापासून पायाच्या अंगठय़ापर्यंत अंग झाकणारा पोशाख घालावा, असा आदेश अफगाणिस्तानातील तालिबान सत्ताधाऱ्यांनी शनिवारी जारी केला. यामुळे मानवाधिकार कार्यकर्त्यांची भीती यामुळे खरी ठरली असून, अफगाणिस्तानचे आंतरराष्ट्रीय समुदायाशी होणारे व्यवहार आणखी गुंतागुंतीचे होणार आहेत.

महिलांनी केवळ त्यांचे डोळे दिसू द्यावेत, असे आवाहन करणाऱ्या आणि डोक्यापासून टाचेपर्यंत बुरखा घालण्याची शिफारस करणाऱ्या या आदेशामुळे, तालिबानच्या १९९६ ते २००१ या कालावधीतील यापूर्वीच्या राजवटीत लादण्यात आलेल्या निर्बंधांची आठवण ताजी झाली आहे. ‘आमच्या भगिनींनी इभ्रत व सुरक्षा यांसह राहावे असे आम्हाला वाटते,’ असे  तालिबानच्या सद्गुण व दुर्गुण मंत्रालयाचे प्रभारी मंत्री खालिद हनाफी यांनी सांगितले.

 तालिबानने यापूर्वी सहावीपेक्षा वरच्या तुकडय़ांमधील मुलींसाठी शाळा पुन्हा सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता. नव्या निर्णयामुळे, देश वाईट अशा मानवीय संकटात सापडला असताना संभाव्य आंतरराष्ट्रीय दात्यांची मान्यता मिळवण्याच्या तालिबानच्या प्रयत्नांना धक्का पोहोचला आहे. ‘सर्व प्रतिष्ठित अफगाणी महिलांनी हिजाब घालणे आवश्यक असून, आमच्या परंपरेचा भाग असलेला आणि प्रतिष्ठित असा चादुरी (डोक्यापासून पायाच्या अंगठय़ापर्यंत बुरखा) हा सर्वात उत्तम हिजाब आहे,’ असे सद्गुण व दुर्गुण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.