जगभरातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी तामिळनाडूमधील एका शेतकऱ्याने चक्क त्यांचे मंदिर बांधले आहे. पी शंकर असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याने या मंदिरासाठी एक लाख २० हजार रुपयांचा खर्च स्वत: केला आहे. “मोदी हे देव असून भारताचा विकास करण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे”, असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे.

तामिळनाडूच्या त्रिचीमधील भाजपा कार्यकर्ता असणाऱ्या पी. शंकर यांनी मोदींवरील प्रेमापोटी आपण हे मंदिर बांधल्याचे म्हटलं आहे. येथील इराकुडी गावामध्ये हे छोट्या आकाराचे मंदिर बांधण्यात आलं आहे. हे मंदिर आता पंचक्रोषीमध्ये ‘नमो मंदिर’ नावाने लोकप्रिय झालं आहे. आजूबाजूच्या गावांमधून अनेकजण या मंदिरामध्ये असणाऱ्या मोदींच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले आहेत. “लोकसभा निवडणुकीआधीच या मंदिराचे काम सुरु झाले होते. मोदींनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं असं मला वाटतं होतं. त्यासाठीच मी हे मंदिर बांधण्याचं ठरवलं,” असं शंकर सांगतात. शंकर हे गावातील शेतकरी गटाचे अध्यक्ष आहेत.

“मोदींनी शेतकऱ्यांसाठी बरीच कामं केली आहे. त्यांनी सुरु केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. मात्र या योजनेची घोषणा करण्यात आली तेव्हाच मला खूप आनंद झाला होता. यामुळेच त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी मी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी मी माझ्या शेतामध्ये एक छोटे मंदिर बांधले, असे मंदिर बांधावे अशी माझी २०१४ पासूनची इच्छा होती.” असं शंकर सांगतात.

“मी मंदिरामध्ये मोदींची धातूची मुर्ती बसवण्याचा विचार केला होता. मात्र त्यासाठी लाखभर रुपयांचा खर्च आला असता. त्यामुळे मी संगमरवरापासून बनवलेली मुर्ती बसवण्याचं ठरवलं. मात्र त्यासाठी मुर्तीकारांनी ८० हजारांचा खर्च सांगितला. आधीच मंदिरासाठी इतका खर्च झाल्याने मी अखेर दोन फूट उंचीची सिमेंटी मुर्ती बसवण्याचा निर्णय घेतला. या मुर्तीची किंमत १० हजार रुपये आहे,” असं शंकर सांगतात. हे संपूर्ण मंदिर शंकर यांनी स्वखर्चाने बांधले आहे. “मी हे मंदिर उभारण्यासाठी स्वत: कमवलेले एक लाख २० हजार रुपये खर्च केले आहेत. मी कोणाकडून देणगी म्हणून एक पैसाही घेतलेला नाही,” असं शंकर अभिमानाने सांगतात.

“मी या मंदिरामध्ये पुजा करण्यासाठी एक पुजारी ठेवण्याचा विचार करत आहे. मात्र त्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद होईपर्यंत मी स्वत: पुजा करत आहे,” असं शंकर म्हणाले.

मोदींचा तो निर्णयही चांगला…

शेतकऱ्यांबरोबरच मोदींनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत देशपातळीवर एकच वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची पूर्वपरीक्षा (नीट) घेण्याचा मोदी सरकारचा निर्णयही कौतुकास्पद आहे असंही शंकर म्हणाले. “माझ्या मुलीला ११०५ गुण मिळाले आहेत. मात्र तरीही खासगी वैद्यकीय कॉलेजने तिच्या अॅडिमशनसाठी ५० लाख रुपये मागितले होते. त्यामुळेच मी तिला कंम्प्युटर सायन्सच्या करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिने होकार दिला होता. मात्र मोदी सरकारने देशभरात एकच परिक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने योग्य विद्यार्थ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचा मला विशे, आनंद आहे,” असं शंकर सांगतात.