तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यात बुधवारी एका रात्रीत २९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विषारी दारू प्यायल्याने या २९ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज कल्लाकुरीची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय जिल्ह्यातील जवळपास ७० हून अधिक व्यक्तींना उपचारांसाठी रुग्णालयांत दाखल केलं आहे. याव्यतिरिक्त पुदुच्चेरीमध्येही १५ जणांना विषारी दारू प्यायल्याने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे. उपचार घेत असलेल्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमकं काय घडलं?

तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यातून बुधवारी रात्री मोठ्या संख्येनं रुग्ण उलट्या आणि इतर तक्रारींसाठी कल्लाकुरीची रुग्णालयात दाखल झाले. त्याव्यतिरिक्त विल्लुपुरम, सालेम आणि पुदुच्चेरी या भागातील रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारचे रुग्ण दाखल झाले. या रुग्णांची तपासणी केली असता त्यांनी विषारी दारू प्यायल्यामुळे त्यांना हा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज रुग्णालयाकडून व प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. कल्लाकुरीची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

रात्रभरात या रुग्णांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार करण्यात येत होते. मात्र, त्यातील काहींची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे उपचारांदरम्यान आत्तापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही मोठ्या संख्येनं रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्यातही अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांची कारवाई, एकाला अटक

दरम्यान, या प्रकरणाचा तामिळनाडू पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून एका व्यक्तीला अटकदेखील केली आहे. पोलिसांनी यासंदर्भात ४९ वर्षीय गोविंदराज उर्फ कन्नूकुट्टी या व्यक्तीला अटक केली आहे. बेकायदेशीररीत्या दारू गाळून विकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. गोविंदराजकडून पोलिसांनी तब्बल २०० लिटर अरकचे कॅनही जप्त केले आहेत. या दारूचे नमुने तातडीने विल्लुपुरम येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यामध्ये विषारी मिथेनॉलचं मोठं प्रमाण असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची प्रतिक्रिया

दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या घटनेचा आपल्याला धक्का बसल्याचं म्हटलं आहे. “कल्लाकुरिचीमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे झालेल्या मृत्यूंचं वृत्त ऐकून मला धक्का बसला असून प्रचंड दु:ख झालं आहे. या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, हा प्रकार होण्यासाठी जे कामचुकार अधिकारी कारणीभूत होते, त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे”, असं स्टॅलिन यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये स्टॅलिन यांनी सविस्तर निवेदनही शेअर केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, जर लोकांनी अशा बेकायदेशीर दारू गाळपाच्या प्रकारांबाबत तक्रार केली, तर त्यावर तातडीने कारवाई केली जाईल. समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या अशा गुन्हेगारांवर अजिबात दया दाखवली जाणार नाही, असंही स्टॅलिन यांनी या निवेदनात स्पष्ट केलं आहे.