निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी म्हटलं आहे की हिंदू संस्कृती ही बंगाली संस्कृतीचा आधार आहे. बंगाली संस्कृतीत येणारे मुस्लिमही त्यात येतात. याबाबत लेखक आणि कवी जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या दुर्गा पूजेचा उत्सव साजरा होतो आहे. त्याचवेळी तस्लीमा नसरीन यांनी केलेली पोस्ट आणि जावेद अख्तर यांनी त्यांना दिलेलं उत्तर दोन्ही चर्चेत आलं आहे.

तस्लीमा नसरीन काय म्हणाल्या?

तस्लीमा नसरीन यांनी दुर्गा पूजेचे फोटो पोस्ट केले. त्यानंतर त्या म्हणाल्या हिंदू संस्कृती हाच बंगालच्या संस्कृतीचा पाया आहे. बंगाली लोकांची खरी ओळख ही हिंदू संस्कृतीमुळेच आहे. आमची राष्ट्रीय ओळखही भारताशीच संबंधित आहे. बंगाली मग तो हिंदू असो किंवा मुस्लिम या सगळ्यांचं नातं भारताशी आणि भारतीय संस्कृतीशी आहे. कुणी बंगाली मुस्लिम असेल तरीही त्याची संस्कृती अरब देशांची नाही तर भारताचीच आहे. बंगाली संस्कृतीची मूळं भारताच्या परंपरेत रुजली आहेत. ढोलावर पडलेली थाप, संगीत, नृत्य या सगळ्या गोष्टी बंगाली संस्कृतीच्या आत्म्यासारख्या आहेत. या गोष्टींना नाकारणं म्हणजे स्वतःला नाकारण्यासारखं आहे. तस्लीमा नसरीन यांच्या या पोस्टवर जावेद अख्तर यांनी उत्तर दिलं आहे.

जावेद अख्तर यांनी काय म्हटलं आहे?

जावेद अख्तर यांनी तस्लीमा नसरीन यांच्या विचारांबाबत सहमती दर्शवली आहे. मात्र त्यांनी हे देखील म्हटलं आहे की आम्ही अवधी आहोत. अवधी लोक बंगाली संस्कृती, भाषा आणि साहित्य यांचा सन्मान करतो. पण कुणाला जर गंगा आणि यमुना यांच्या आदराची परंपरा कळत नसेल तर ती त्या व्यक्तीतली कमतरता आहे. ही संस्कृती अरब देशांशी जोडलेली नाही. तसंच पारशी, मध्य आशियातील संस्कृतीही आपल्या परंपरांशी जोडल्या गेल्या आहेत. मात्र ते अटी-शर्थींवर जोडले गेले आहेत. असंच बंगालमध्येही दिसतं. बंगालमध्ये अनेक आडनावं ही पारशी मूळ असलेली आहेत. असं उत्तर जावेद अख्तर यांनी दिलं आहे.

तस्लीमा नसरीन यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया

काही युजर्स म्हणत आहेत की तस्लीमा नसरीन यांनी जे सांगितलं ते ऐतिहासिक सत्य आहेत. बंगाली मुस्लिम त्यांचे रिती रिवाज, खाणं पिणं आणि भाषा हे सगळं हिंदू संस्कृतीशी जोडलं गेलं आहे. तर काही युजर्स असं म्हणत आहेत की भारतीय संस्कृतीकडे एकाच दृष्टीने पाहून नाही. एकांगी विचार करणं योग्य नाही. कारण भारतीय संस्कृती वैविध्याचा संगम आहे. आता यावर आणखी काही उत्तरं नसरीन यांना दिली जातात का? हे पाहणंही महत्त्वाचं असेल.