नवी दिल्ली: नव्या राष्ट्रीय सहकार धोरणाच्या माध्यमातून शहरांमध्ये डिसेंबरपर्यंत सहकारी संस्थाच्या माध्यमातून शहरांमध्ये टॅक्सी सेवा सुरू केली जाईल. तसेच देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक‘ सहकार गाव’ विकसित करणार आहे. येत्या दहा वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पन्नातील सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीने वाढविणार असल्याचे केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी येथे जाहीर केले.
शहरातील टॅक्सी चालकांच्या सहकारी संस्था स्थापन करून त्यांच्या माध्यमातून ही सेवा डिसेंबरपूर्वी सुरु केली जाईल. यातून मिळणारा सर्व लाभ संबंधित टॅक्सीचालकांना मिळेल. या संस्थांना सरकार मदत करणार आहे. यामध्ये वाहन घेण्यासाठी मदतीचा समावेश असेल. सध्या ॲप आधारीत टॅक्सीसेवेवरून प्रवासी तसेच टॅक्सीचालकांची होणारी पिळवणूक लक्षात घेता या नव्या उपक्रमाला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.
सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतरचे पहिलेच राष्ट्रीय सहकार धोरण दिल्ली येथील ऊर्जा भवनात शहा यांच्या हस्ते जाहीर करण्यात आले. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, सहकार सचिव आशीष भुतांनी उपस्थित होते. राष्ट्रीय सहकार धोरणानुसार प्रत्येक राज्यांनीही सहकार धोरण जाहीर करण्याची सूचनाही शहा यांनी केली. सहकारी बँका, साखर कारखाने यांनाही भरीव मदत करण्यात येणार असून ज्या राज्यांत सहकार कमकुवत आहे येथे अधिक मदत करून सहकाराचा समांतर विकास करणार आणि या क्षेत्राला अन्य क्षेत्रांप्रमाणेच साह्य करण्याचा सरकारचा मनोदय असल्याचेही शहा सांगितले.
वैशिष्ट्ये काय?
नव्या धोरणाच्या माध्यमातून येत्या १० वर्षांत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीने वाढविण्यात येणार आहे.
या धोरणाच्या माध्यमातून पुढील २५ वर्षांतील सहकार क्षेत्राचा वाटचालीचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून देशातील प्रत्येक गावात सहकारी संस्थांचे जाळे उभारले जाणार आहे.
नव्या धोरणात महिला, तरुण यांना केंद्रबिंदू मानून त्यांना सक्षम आणि व्यावसायिक तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच नवीन क्षेत्रात सहकार रुजवणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.