हरयाणा सरकार येत्या शैक्षणिक सत्रापासून राज्यातील शाळांमध्ये भगवद्गीतेचे श्लोक शिकवण्यास सुरुवात करेल, असे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी सांगितले.
शाळांमधील विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक सत्रापासून भगवद्गीतेचे श्लोक शिकवले जातील. त्याचप्रमाणे गोहत्येसाठी कठोर शिक्षेची तरतूद असलेले नवे विधेयक सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाईल, असे ते म्हणाले.
प्रस्तावित गोवंश संरक्षण व गोसंवर्धन विधेयकात गोहत्येसाठी कठोर शिक्षा आणि देशी गाई-बैलांची अधिक चांगली काळजी यासाठी तरतूद केली जाईल. गोमांस विक्रीवर तत्काळ बंदी लागू करण्यासाठीही सरकारने पावले उचलली असल्याचे ते म्हणाले.
भ्रष्टाचार ही मुख्य समस्या असून तो संपवण्याला आपल्या सरकारचे प्राधान्य राहील. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून दक्षता विभागाने भ्रष्टाचार गुंतलेल्या ज्या अधिकाऱ्यांना पकडले, त्यांची संख्या गेल्या १० वर्षांतील एकूण संख्येपेक्षा जास्त आहे, असा दावा खट्टर यांनी केला.