Techie arrested in Bengaluru for shouting pro-Pakistan slogans : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढलेला आहे. यादम्यान पाकिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली बंगळुरू पोलिसींनी एका २५ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याला अटक केली आहे.

आरोपीचे नाव शुभांशू शुक्ला असे असून तो छत्तिसगडचा रहिवासी आहे. शुक्ला हा गेल्या वर्षभरापासून एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. ९ मे रोजी रात्री १२.३० वाजता तो राहत असलेल्या पीजीमध्ये ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री तो प्रशांत लेआउटमधील त्याच्या दुसर्‍या मजल्यावरील पीजीच्या बाल्कनीमध्ये उभा राहिला आणि त्याने पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा दिल्या.

दरम्यान रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या पीजीमधील रहिवाशाने टेरेसवर धाव घेतली आणि या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर पोलीस हेल्पलाईन ११२ वर फोन करून हा व्हिडीओ पोलि‍सांना देण्यात आला, अशी माहिती व्हाईटफील्ड पोलि‍सांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की शुक्लाने तीन वेळा घोषणा दिली, मात्र व्हिडीओमध्ये तो शेवटची घोषणा देत असताना प्रसंग कैद झाला. पोलि‍सांनी त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम १५२ (भारताच्या सार्वभौमत्वाला आणि एकतला धोका निर्माण करणारी कृत्ये), १९७ (१) (ड) (भारताच्या एकात्मतेविरोधात विधान), आणि ३५३ (१) (सामाजिक वाद निर्माण करणारे विधान करणे) या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्ला याने सांगितलं की, त्याने कोणतीही इजा पोहोचवण्याच्या हेतूशिवाय, आततायीपणाने या घोषणा दिल्या.

अधिकार्‍यांनी पडताळणीच्या उद्देशाने या घटनेचा व्हिडीओ फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत पाठवला आहे, तसेच शुक्ला याच्या आवाजाचा नमुना घेऊन त्याची तुलना करण्यासाठी देण्यात आला आहे. तसेच त्याने मद्य सेवन किंवा अंमली पदार्थांचे सेवन केले आहे का, हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताच नमुने देखील घेण्यात आले होते.

शुक्ला याला सुरुवातीला ९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्या पुढील चौकशीसाठी त्याची कोठडी मागितली. त्यानंतर पुन्हा उर्वरित चौकशीसाठी त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठवड्यात दुसरी घटना

अशा प्रकरणात बंगळुरू शहरात झालेली या आठवड्यातील ही दुसरी अटक आहे. यापूर्वी एक २५ वर्षीय व्यक्ती नवाज याला एका व्हायरल व्हिडीओप्रकरणी अटक करण्यात आली होती. या व्हायरल व्हिडीओमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.