Air India Flight Delay : अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर मागील काही दिवसांत तांत्रिक बिघाड आणि सुरक्षेच्या कारणास्तव बोईंग विमानांना आपत्कालीन लँडींग करावी लागल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. सातत्याने तांत्रिक बिघाडाच्या घटना घडल्यामुळे प्रवाशांना देखील त्रासाला सामोरं जावं लागतं. दरम्यान, आता दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या सिंगापूरला जाणाऱ्या एका विमानातून प्रवाशांना उतरवण्याची वेळ आल्याचा प्रकार घडला आहे.

नेमकं काय घडलं?

बुधवारी रात्री एअर इंडियाच्या आय २३८० या विमानात एअर कंडिशनिंग आणि इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे २०० पेक्षा जास्त प्रवाशांना विमानात सुमारे दोन तास बसून राहावं लागलं. मात्र, त्यानंतरही तातडीने दुरुस्ती न झाल्यामुळे या प्रवाशांना दिल्ली विमानतळावर विमानातून खाली उतरावे लागले. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

वृत्तानुसार, बोईंग ७८७-९ ड्रीमलाइनर रात्री ११ वाजताच्या सुमारास उड्डाण करणार होतं. पण तेव्हा अचानक तांत्रिक समस्या उद्भवल्या. एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे काही प्रवाशांना अस्वस्थता जाणू लागली. काही प्रवाशांना हवा घेण्यासाठी पेपर्सचा वापर करावा लागला. विमानात सुमारे दोन तास वाट पाहिल्यानंतर सर्व प्रवाशांना टर्मिनल इमारतीत हलवण्यात आले. दरम्यान, या सर्व गोंधळाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एअर इंडियाने काय स्पष्टीकरण दिलं?

दरम्यान, या घटनेबाबत गुरुवारी एका निवेदनात एअर इंडियाने म्हटलं की, दिल्लीवरून सिंगापूरला जाणाऱ्या विमानाला केबिन कूलिंग समस्येमुळे उशिर झाला. प्रवाशांना विलंबाची माहिती नियमितपणे देण्यात आली होती. दिल्लीतील आमच्या सहकाऱ्यांनी विमानतळावरील प्रवाशांना सर्वतोपरी मदत केली. ज्यामध्ये अल्पोपहार आणि जेवणाचा समावेश होता. विमान बदलल्यानंतर विमान ५.३६ वाजता भारतीय वेळेनुसार रवाना करण्यात आले”, असे वृत्तसंस्था पीटीआयने एअरलाइनच्या हवाल्याने म्हटले आहे. तसेच प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअरलाइनने खेद व्यक्त केला.