तिस्ता नदी पाणीवाटप करार हा भारताच्या दृष्टीने अवघड मुद्दा आहे. त्यावर देशात सहमती घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना सांगितले. हसीना यांनी मनमोहन सिंग यांच्याशी २० मिनिटे चर्चा केली. यामध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
जानेवारीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना यांच्या अवामी लीगने प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर पहिल्यांदाच हसीना मनमोहन सिंग यांना भेटल्या.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतल्यानंतर तिस्ता करार प्रलंबित ठेवण्यात आला आहे. या करारांतर्गत बांगलादेशला दिल्या जाणाऱ्या पाण्याचा प्रमाणाबाबत बॅनर्जी यांचा आक्षेप आहे. त्यामुळे त्यांनी सप्टेंबर २०११ मध्ये पंतप्रधानांच्या ढाका दौऱ्यातून माघार घेतली होती.