अटक करण्यात आल्यानंतर तब्बल ८० दिवसांनी तेहलकाचा संस्थापक-संपादक तरुण तेजपाल याच्यावर गोवा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. बलात्कार, लैंगिक शोषण, आपल्या कनिष्ठ सहकारी महिलेचा विनयभंग असे विविध आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. प्रत्यक्ष आरोपपत्र दाखल करण्यास जरी अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला असला तरी खटला लवकर निकाली निघावा, यासाठी खटल्याची दररोज सुनावणी घ्यावी अशी विनंती पोलिसांतर्फे करण्यात आली आहे.
गेल्या १ डिसेंबरपासून तेजपाल कोठडीत आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात ६८४ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये भारतीय दंड विधान कलम ३५४, ३५४ अ (लैंगिक छळ), कलम ३४१, ३४२, कलम ३७६ (बलात्कार), ३७६(२)(एफ) आणि ३७६ (२)(के)(आपल्या पदाचा गैरवापर करीत सहकारी महिलेवर बलात्कार करणे) अशा कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.
मुख्य न्यायदंडाधिकारी अनुजा प्रभुदेसाई यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, तेजपाल आणि पीडित महिला यांच्यातील ई-मेल, लघुसंदेश (एसएमएस), साक्षीदारांच्या जबान्या, सीसीटीव्ही फूटेज आदींचा पुरावे म्हणून समावेश करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी १५२ जणांचे जबाब नोंदविले होते. त्यांचा तसेच तेजपाल आणि पीडित महिला यांच्यातील ई-मेलचा आरोपपत्र तयार करताना प्रामुख्याने आधार घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यायमूर्तीना विनंती
गुन्हेगारी प्रक्रिया कायद्याच्या दुरुस्त करण्यात आलेल्या कलम ३०९(१) अन्वये विशेष सरकारी वकील मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांना हे प्रकरण तातडीने निकाली काढले जावे अशी विनंती केली आहे. या कलमात, खटल्याची सुनावणी दररोज घेतली जावी आणि ६० दिवसांत प्रकरण निकाली काढले जावे, अशी तरतूद आहे. त्याचा आधार घेत ही विनंती करण्यात आल्याचे उपमहानिरीक्षक ओ. पी. मिश्रा यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tehelka case tarun tejpal charged with rape of woman colleague
First published on: 18-02-2014 at 12:30 IST