Tej Pratap Yadav : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तसेच तेज प्रताप यादव यांना कुटुंबातूनही बेदखल केल्याचं लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं होतं. राष्ट्रीय जनता दल पक्षामधून हकालपट्टी झाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक तेज प्रताप यादव हे अपक्ष लढणार असल्याची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
दरम्यान, तेज प्रताप यादव यांनी आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. तेज प्रताप यादव यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५ पक्षांबरोबर युतीची घोषणा केली आहे. त्यामुळे तेज प्रताप यादव यांचा हा तेजस्वी यादवांना धक्का तर नाही ना? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
कोणत्या पाच पक्षांबरोबर युतीची घोषणा केली?
-विकास वंचित इंसान पार्टी (व्हीव्हीआयपी),
-भोजपुरी जन मोर्चा (बीजेएम)
-प्रगतीशील जनता पार्टी (पीजेपी)
-वाजिब अधिकार पार्टी (डब्ल्यूएपी)
-संयुक्त किसान विकास पार्टी (एसकेव्हीपी)
तेज प्रताप यादव काय म्हणाले?
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तेज प्रताप यादव यांनी पार्श्वभूमीवर ५ पक्षांबरोबर युतीची घोषणा केल्यानंतर पाचही घटक पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह पत्रकार परिषदेत घेत त्यांनी या निर्णयाची माहिती दिली. तेज प्रताप यादव यांनी म्हटलं की, “युतीचे उद्दिष्ट सामाजिक न्याय, हक्क आणि राज्याच्या विकासाचे समर्थन करणे आहे. लोक माझी थट्टा करण्यास मोकळे आहेत. पण मी माझ्या मार्गाने चालेन”, असं तेज प्रताप यादव यांनी म्हटलं आहे.
आज दिनांक: 05/08/2025, स्थान: मौर्य होटल(केसरिया हॉल) में हमारे नेतृत्व में टीम तेज प्रताप यादव के साथ प्रमुख पांच पार्टियों का गठबंधन सह प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया।
— Tej Pratap Yadav (@TejYadav14) August 5, 2025
पार्टियों के नाम निम्न हैं:
1. विकास वंचित इंसान पार्टी(VVIP)
2. भोजपुरिया जन मोर्चा(BJM)
3. प्रगतिशील… pic.twitter.com/nkV37t5qrU
तेज प्रताप यादव कोणत्या मतदारसंघातून लढणार?
तेज प्रताप यादव यांनी काही दिवसांपूर्वी पाटणा येथील एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं की, ते विधानसभेची निवडणूक कोणत्याही पक्षातून नाही तर अपक्ष लढवणार आहेत. तसेच बिहारमधील महुआ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं तेज प्रताप यादव यांनी सांगितलं होतं.
कोण आहेत तेज प्रताप यादव?
३७ वर्षीय तेज प्रताप यादव हे लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. त्यांच्यानंतर तेजस्वी यादव हा लहान मुलगा आहे. तेज प्रताप यादव यांनी बिहारचे मंत्रीपदही भुषविले होते. २०१८ साली माजी मुख्यमंत्री दरोगा रॉय यांची नात ऐश्वर्या रॉय हिच्याशी त्यांचे लग्न झाले होते. मात्र काही महिन्यातच ऐश्वर्याने तेज प्रताप यादव यांच्यावर अनेक आरोप करत यादवांच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.