Tej Pratap Yadav : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी त्यांचे पुत्र तथा माजी मंत्री तेज प्रताप यादव यांची काही दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. एवढंच नाही तर कुटुंबातूनही बेदखल केल्याचं लालू यादव यांनी सांगितलं आहे. दरम्यान, तेज प्रताप यादव यांचं बेजबाबदार वर्तन आणि कौटुंबिक मूल्ये तसेच सार्वजनिक जीवनातील शिष्टाचारापासून विचलित झाल्याचं कारण सांगत हा निर्णय घेतल्याचं लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलामधून हकालपट्टी झाल्याच्या नंतर आता आगामी विधानसभा निवडणूक तेज प्रताप यादव हे अपक्ष लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार तेज प्रताप यादव यांनी शनिवारी जाहीर केलं की ते आगामी बिहार विधानसभा निवडणूक स्वतंत्र उमेदवार अर्थात अपक्ष म्हणून लढवणार आहेत. आज त्यांनी स्वत:ची अपक्ष उमेदवारी निश्चित केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
तेज प्रताप यादव काय म्हणाले?
“मी महुआ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. मला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. तरुणही आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत,” असं तेज प्रताप यादव यांनी शनिवारी पाटणा येथील एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं आहे. विधानसभेची निवडणूक ही कोणत्याही पक्षातून नाही तर अपक्ष लढवणार असल्याचं तेज प्रताप यादव यांनी सांगितलं आहे.
तेज प्रताप यांच्या हकालपट्टीनंतर तेजस्वी यादव काय म्हणाले होते?
दरम्यान, आपल्या मोठ्या भावावर वडिलांनी केलेल्या कारवाईवर लालू यादव यांचे धाकटे पुत्र व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, “आम्हाला हे सगळं योग्य वाटत नाही. हे सहन होण्यापलीकडचं आहे. हे प्रकरण माझ्या मोठ्या भावाशी संबंधित आहे. मात्र, ते प्रौढ आहेत, खासगी आयुष्यात काय निर्णय घ्यायला हवेत, काय नको ते ठरवण्याइतके मोठे ते नक्कीच आहेत. त्यांना त्याचा अधिकारही आहे. मात्र, आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्याबद्दल जो काही निर्णय घेतला आहे तो आता सार्वजनिक झाला आहे. बाकी मी त्यावर फार काही बोलू शकत नाही.”
कोण आहेत तेज प्रताप यादव?
३७ वर्षीय तेज प्रताप यादव हे लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. त्यांच्यानंतर तेजस्वी यादव हा लहान मुलगा आहे. तेज प्रताप यादव यांनी बिहारचे मंत्रीपदही भुषविले होते. २०१८ साली माजी मुख्यमंत्री दरोगा रॉय यांची नात ऐश्वर्या रॉय हिच्याशी त्यांचे लग्न झाले होते. मात्र काही महिन्यातच ऐश्वर्याने तेज प्रताप यादव यांच्यावर अनेक आरोप करत यादवांच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.