Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाला सातत्यानं लक्ष्य करत आहेत. मतदार याद्यांमधील कथित अनियमिततेच्या आरोपांवरून निवडणूक आयोगावर आणि भारतीय जनता पक्षावर मत चोरीचा आरोप राहुल गांधी करत आहेत. या संदर्भात काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेत काही पुरावेही सादर केले होते. दरम्यान, यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

असं असतानाच राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये ‘व्होटर अधिकार यात्रा’ काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे विविध ठिकाणी सभा आणि मेळावे घेत सरकारवर टीका करत आहेत. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची ‘व्होटर अधिकार यात्रा’ रविवारी बिहारच्या अररिया या ठिकाणी पोहोचली असता त्यांनी पत्रकार परिषद घेत संबोधित केलं. मात्र, यावेळी झालेल्या एका हलक्याफुलक्या विनोदाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

नेमकं काय घडलं?

बिहारच्या अररिया या ठिकाणी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संबोधित केलं. यावेळी आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यावर टीका केली. चिराग पासवान यांच्याबद्दल बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, “चिराग पासवान हा आजच्या चर्चेता मुद्दा नाही. पण तरीही त्यांना मी एक सल्ला नक्कीच देईन, कारण ते आमचे मोठे बंधू आहेत. चिराग पासवान यांनी लवकरात लवकर लग्न करावं”, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं.

दरम्यान, तेजस्वी यादव यांनी चिराग पासवान यांना दिलेल्या लग्नाच्या सल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची एकच चर्चा रंगली आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, “हा सल्ला मलाही लागू होतो.” दरम्यान, राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

तेजस्वी यादवांची सरकारवर टीका

एसआयआरबाबत बोलताना तेजस्वी यादव यांनी म्हटलं की, “ही प्रक्रिया इतकी कठीण आहे की, मते जोडणे असोत किंवा तक्रार करून ती हटवणे असोत. या प्रक्रियेत अद्यापही कोणतीही स्पष्टता नाही. निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाबरोबर काम करत आहे. त्यामुळे भाजपाने निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना वाचवण्यासाठी संसदेत कायदा आणला, जेणेकरून त्यांच्यावर कोणतीही कारवाई किंवा खटला चालवता येणार नाही. ते कायद्याशी कसं खेळत आहेत हे तुम्हाला समजू शकतं. पण जनता त्यांना सोडणार नाही.”