Prophet remarks Row : तेलंगाणामधील भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ हैदराबाद शहरात नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, राजा सिंह यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. तसेच भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.
हेही वाचा >> हेही वाचा >>> प्रेषित पैगंबरांबद्दल वादग्रस्त विधान केलेल्या भाजपा आमदाराला अटक; हैदराबादमध्ये रात्रभर सुरु होती आंदोलनं
टी राजा सिंह यांचा स्टॅण्डअप कॉमेडियन मुन्नवर फारुकीसंदर्भात बोलतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे दिसत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, हैदराबादसह देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सिंह यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली जात होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. दोन गटांत द्वेषभाव निर्माण करणे, धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करणे, अशा भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत टी राजा सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपानंतर टी राजा सिंह यांना भाजपाने पक्षातून निलंबित केले आहे. तर दुसरीकडे टी राजा सिंह यांच्या विधानानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर टीका केली आहे. “हैदराबादमधील शांतता भाजपाला पाहवत नाहीये. भाजपाला सामाजिक सलोखा टिकू द्यायचा नाही. मुस्लिमांना भावनिक तसेच मानसिकदृष्ट्या त्रास द्यायचा हे भाजपाचे अधिकृत धोरण आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या नुपूर शर्मा सध्या तुरुंगात आहेत का? त्यांना भाजपाने पोलीस संरक्षण दिले आहे. भाजपा आमदाराने केलेल्या वक्तव्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहमत आहेत का?” असा सवाल ओवैसी यांनी केला.