तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काही मंत्री स्टूलवर बसलेले दिसत आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क हे जमिनीवर एका बाजूला बसलेले दिसत आहेत. यावरूनच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या सरकारवर विरोधक जोरदार टीका करत आहेत.

भारत राष्ट्र समितीने (‘बीआरएस’) अधिकृत एक्स हॅडलवरून व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क यांचा हा अपमान असल्याचे ‘बीआरएस’ने म्हटले आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि त्यांच्या सरकारमधील काही मंत्री तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यातील एका मंदिरात गेले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क यांच्यासोबत हा प्रकार घडल्याचा दावा ‘बीआरएस’कडून करण्यात आला आहे.

हेही वाचा : “भाजपा कुणीतरी छुपारुस्तुम उमेदवार शोधेल आणि…”, सुशीलकुमार शिंदेंचा टोला

तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क हे मधिरा मतदारसंघातून चार वेळा निवडून आलेले आहेत. तर त्यांनी तेलंगणात काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी मोठी मेहनत घेतल्याचे सांगितले जाते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत ‘केसीआर’ यांच्या भारत राष्ट्र समितीला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर तेलंगणात काँग्रेसचे सरकार आले. त्यावेळी मल्लू भट्टी विक्रमार्क यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदी रेवंत रेड्डी यांची वर्णी लागली. तर मल्लू भट्टी विक्रमार्क यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेलंगणात काँग्रेसचे सरकार आणण्यात उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क यांचा मोलाचा वाटा मानला जातो. त्यांनी राज्यात १ हजार ३६५ किलोमीटरची रॅली काढली होती. दरम्यान, एका मंदिराच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काही मंत्री स्टूलवर बसले होते. पण उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क हे जमिनीवर बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस दलित नेत्यांचा अवमान करत असल्याचा आरोप ‘बीआरएस’ने केला आहे.