संसदेत आक्रमक पवित्रा घेण्याचे तेलुगू देसमचे संकेत; मनधरणीचे प्रयत्न सुरू

गुजरात निवडणुकीत काठावरचे बहुमत आणि राजस्थानातील पोटनिवडणुकीतील दारुण पराभवामुळे चिंताग्रस्त असलेल्या भाजपची डोकेदुखी घटकपक्षांनी आणखी वाढवली आहे. पुढील वर्षी किंवा मुदतीआधीच लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपच्या वर्चस्ववादाविरोधातील नाराज घटकपक्षांच्या यादीत तेलुगू देसम पक्षाची (टीडीपी) भर पडली आहे. आघाडीतून बाहेर पडणार नसल्याचे ‘टीडीपी’ने स्पष्ट केले असले तरी घटकपक्षांच्या दबावामुळे भाजपने त्यांची मनधरणी सुरू केली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्रप्रदेशला न्याय देण्यात आला नाही, अशी टीका करत ‘टीडीपी’ने बंडाचे निशाण फडकावले होते. त्यामुळे टीडीपी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणार, अशी जोरदार चर्चा होती. ‘टीडीपी’चे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी पक्षाच्या आमदार, खासदार, नेत्यांची बैठक बोलावली होती. भाजपसोबत कायम राहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असला तरी चंद्राबाबू नायडू यांनी पक्षाच्या खासदारांना संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील ‘टीडीपी’ हा दक्षिणेतील एकमेव मोठा घटकपक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी ‘टीडीपी’सह घटकपक्षांना नाराज करणे भाजपला परवडणारे नाही. यामुळे भाजपने नरमाईची भूमिका घेतली आहे. ‘‘काही गोष्टींत ‘टीडीपी’ नाराज असल्याचे दिसत आहे. ‘टीडीपी’ हा आमचा जुना घटकपक्ष असून, या पक्षाशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल’’, असे भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी सांगितले. शिवसेनेने २०१९मधील निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपप्रणीत आघाडीला हादरा बसलेलाच आहे. ‘टीडीपी’ने शिवसेनेशी संपर्क साधल्याच्या वृत्तामुळे भाजपच्या चिंतेत भर पडली.

राष्ट्रीय लोकशाही आघाडतील घटकपक्ष असलेल्या बिहारमधील राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (आरएसएलपी)नेते उपेंद्र कुशवाह यांनी अलीकडेच राजद नेत्यांसोबत एकाच मंचावर उपस्थित राहून भाजपशी फारकत घेण्याचे संकेत दिले. बिहारमध्ये भाजपने संयुक्त जनता दलाशी पुन्हा घरोबा केल्याने ‘आरएसएलपी’ नाराज आहे. लोकसभेच्या बिहारमधील ४० जागा स्वबळावर लढण्याचे संकेतही कुशवाह यांनी दिले आहेत.

आघाडीतील अकाली दलानेही भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. अकाली दलाचे खासदार नरेश गुजराल यांनी ‘द वायर’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत चंद्राबाबू नायडू यांना पाठिंबा दर्शवत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. ‘‘तुम्हाला उद्धटपणे आघाडी चालवता येणार नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे आघाडीचे कामकाज चालविणे आवश्यक आहे’’, असे गुजराल यांनी म्हटले आहे. त्याआधी शिवसेनेने २३ जानेवारी रोजी स्वबळावर निवडणुका लढविण्याची घोषणा केली होती. घटकपक्षांच्या या नाराजीमुळे भाजपची चिंता वाढली आहे.